नागपूर-नागपूर मधील हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होत आहे. या अधिवेशनाच्या आधीच विरोधी पक्षांनी एकमूठ बांधत सरकारला घेण्याची तयारी केली आहे. तर दुसरीकडे विविध पक्ष आणि संघटनांच्या वतीने हिवाळी अधिवेशनावर जवळपास 100 मोर्चे धडकणार आहेत. त्यामुळे ऐन हिवाळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचाल चांगलाच घाम फुटणार काय? असा प्रश्न उपस्थित केला जातोय .
नागपुरात हिवाळी अधिवेशनावर जवळपास 100 मोर्चे धडकणार आहेत. आतापर्यंत 45 पेक्षा जास्त मोर्च्यांना आतापर्यंत परवानगी देण्यात आली आहे. मोर्चांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिस यंत्रणांच्या वतीने सीसीटीव्ही, ड्रोन, मोबाईल सर्व्हिलंस व्हॅन तैनात करण्यात आल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची काळजी प्रशासनाच्या वतीने घेण्यात येत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सरकारला घेरण्यासाठी विरोधकांनी चांगलीच तयारी केली आहे. या संदर्भात मविआच्या प्रमुख नेत्यांची बैठक नागपुरात पार पडली. या बैठकीला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री अनिल देशमुख, अजय चौधरी आदी नेते उपस्थित होते. या बैठकीत सभागृहात सरकारला घेरण्यासाठी रण तयार करण्यात आली आहे. तर दुसरीकडे सभागृहाच्या बाहेर सरकारला घेरण्यासाठी मोर्चे काढण्यावरही विरोधकांचा भर असेल.
नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, या अधिवेशनासाठी प्रशासनाच्या वतीने तयारी करण्यात आली आहे. हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपुरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. हिवाळी अधिवेशनात सुरक्षेसाठी 11 हजार पोलिस तैनात करण्यात येणार आहेत. व्हीआयपी सुरक्षा ही पोलिसांची प्राथमिकता असेल, असेही त्यांनी सांगितले. त्यासाठीी राज्य राखीव पोलिस दलाची एक तुकडी, दंगा नियंत्रण पथक देखील 24 तास तैनात असेल, असेही अमितेश कुमार यांनी सांगितले.

