मुंबई-पुणे, मुंबई, नाशिक, धारशिवसह कोकणात मुसळधार पाऊस पडत आहे. कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात बहुतेक ठकाणी आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईत पावसाचा जोर वाढला आहे. मुसळधार पावसाने मुंबईला अक्षरश: झोडपून काढले. वाऱ्यांचा वेग जास्त असल्याने काही ठिकाणी झाडपडीच्या घटना देखील घडल्या. विक्रोळीत निर्माणाधीन इमारतीचा स्लॅब कोसळल्याने दोघांचा मृत्यू झाला.मृतांमध्ये बाप लेकांचा समावेश आहे. नागेश रेड्डी आणि रोहित रेड्डी अशी मृतांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, विक्रोळी पार्क साइट परिसरात टाटा पावर हाऊस ही इमारत आहे. या इमारतीत नागेश रेड्डी सुरक्षारक्षक म्हणून काम करत होते. रविवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास त्यांना डबा देण्यासाठी मुलगा रोहित हा परिसरात आला. परंतु पाऊस पडत असल्यामुळे रेड्डी यांनी त्यांच्या मुलाला तिथेच थांबण्यास सांगितले परंतु अचानक या इमारतीचा काही स्लॅब कोसळाला आणि दोघेही या स्लॅबखाली दबले.माहिती मिळताच पोलिस आणि बचावपथकाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. बापलेकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, रविवारी रात्रभर मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस सुरू होता. पावसामुळे अनेक भागात पाणी साचले. परळ भागातील अनेक रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आलं. त्यामुळे मध्यरात्री अनेकांच्या घरात पाणी शिरले. मेट्रोचे काम सुरू असल्याने हे आमच्या घरात पाणी शिरत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला.