जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्ह्ज व आयजीबीसी पुणे चॅप्टर यांचा उपक्रम
पुणे- नाल्यांचे पर्यावरणीय पुनरुज्जीवन करताना घरे, सोसायट्यांमधून नाल्यात पडणारे सांडपाणी स्वच्छ करण्याबरोबर घनकचऱ्याची विल्हेवाट लावणे, डोंगरातून येणाऱ्या पाण्यासाठी पुरेशी जागा करून देणे, पाण्याचा प्रवाह नियमीत करणे, नाल्याकाठी झाडे लावून नाल्यामध्ये काही प्रवाह तयार करणे हे पर्यावरणासाठी आवश्यक आहे. नाल्याचे नैसर्गिकरित्या सुशोभिकरण, पाणी स्वच्छता, दुर्गंधी मिटवणे, डासांची पैदास रोकणे व परिसरातील जैवविविधता सुधारणे हे देखील महत्वाचे असल्याने यातूनच नाल्याचे पुनरुज्जीवन शक्य असल्याचे मत तज्ज्ञांनी “नाला पुनरुज्जीवन” चर्चासत्रात व्यक्त केले.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्ह्ज व आयजीबीसी पुणे चॅप्टर यांच्या वतीने पर्यावरणीय नाला पुनरुज्जीवन या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात सृष्टी इको रिसर्च इन्स्टिट्यूटच्या सायली जोशी व इकोसत्व सोल्युशन्सच्या मेधावी राजवाडे या तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. यावेळी विविध पर्यावरणप्रेमी, अर्चिटेक्टस, इंजिनिअर, महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी, सामाजिक संस्था प्रतिनिधी, सल्लागार व विविध कंपन्यांचे प्रतिनिधी तसेच पुणे महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते. पर्यावरण दिनाचे औचित्य साधत सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्ह्ज या सामाजिक संस्थेचे वार्षिक अहवालाचे इ-प्रकाशन करण्यात आले. या अहवालात संस्थेच्या वतीने विविध संस्थांबरोबर केलेल्या उपक्रम व प्रकल्प यांचा वार्षिक कार्याचा अहवाल आहे.
अनघा परांजपे पुरोहित यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. भूषण भालेराव यांनी चर्चेचा समारोप केला तर अनघा आठवले यांनी सूत्रसंचालन व अमोल उंबरजे यांनी समन्वय केले. सायली जोशी यांनी प्रदूषित प्रवाहांची पर्यावरणीय जीर्णोद्धार तर मेधावी राजवाडे यांनी पर्यावरणीय पुनरुज्जीवनची संकल्पना या विषयांवर सादरीकरण केले.