हजारो रहिवाश्यांना मिळणार लाभ
मुंबई, दि. ३० – ठाणे जिल्ह्यातील कल्याण व ठाणे तालुक्यातील कल्याण शिळा निळजे (पलावा) ते नारीवली-बाळे-वाकळण-दहिसर हे मार्ग इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग प्रमुख मार्ग म्हणून दर्जोन्नत करण्याच्या निर्णय सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी घेतला आहे. हे मार्ग दर्जोन्नती करण्यात आल्यामुळे या परिसरातील रहिवाश्यांना अधिक दर्जेदार व सुस्थितीत स्वरुपाचे रस्ते उपलब्ध होणार आहेत.
कल्याण शिळ रोड तसेच निलजे-पलावा हे रोड सध्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका व जिल्हा परिषद यांच्या ताब्यात आहेत. परंतु पुरेश्या निधी अभावी तसेच काही कायदेशीर तंटयामुळे रस्त्याच्या बहुतांश भागांची देखभाल योग्य पध्दतीने होऊ शकत नव्हती व त्याचा फटका या परिसरताली वाहनचालक व नागरिकांना होत होता. लोढा परिसरातील कासा रिओ व कासा रिओ टाऊनशिप या परिसरात राहणा-या हजारो रहिवाश्यांना या खराब रस्त्यांचा नाहक त्रास सोसावा लागत होता. पुरेश्या निधी अभावी या रस्त्यांची देखभाल योग्य प्रकारे होत नसल्यामुळे हा रस्ता म्हणजे खड्ड्यांचा रस्ता म्हणून ओळखला जायचा. दुरावस्था झालेल्या या रस्त्याचा धोका हा वाहनचालक व पादचा-यांना मोठ्या प्रमाणात होत होता.
सदर रस्ता दर्जोन्नत व सुस्थितीत करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे या परिसरातील नागरिकांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. मंत्री चव्हाण यांनी या गंभीर विषयाची दखल घेत विभागाच्या अधिका-यांशी बैठक घेऊन ठाणे जिल्ह्यातील कल्याण व ठाणे तालुक्यातील इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग रस्त्यांना प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्याचप्रमाणे या परिसरातील नागरिकांना रस्त्याच्या चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देश्याने मंत्री चव्हाण यांनी रस्ते विशेष दुरुस्ती अर्थसंकल्पात १८.५ कोटीची तरतुद करण्याच नियोजन केले आहे.
मंत्री चव्हाण यांच्या या निर्णयामुळे कल्याण व ठाणे तालुक्यातील रस्ते लवकरकच अधिक दर्जेदार व सुस्थितीत होणार आहेत. यामुळे या परिसरातील वाहनचालक व रहिवासी यांना ख-या अर्थाने दिलासा मिळाला आहे. आता या रस्त्याचे काम लवकरच सुरु होणार असून याबाबतचा शासन निर्णय नुकताच प्रसिध्द झाला आहे.
ठाणे व कल्याणमधील ग्रामीण रस्त्यांना आता प्रमुख जिल्हा मार्गाचा दर्जा -सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचा निर्णय
Date:

