पुणे, दि. 8 एप्रिल : “जीवनात सदैव प्रसन्न राहण्यासाठी प्रथम मी जीवंत आहे, द्वितीय रोज स्वतःला आरशात पहा, तृतीय समोरील व्यक्तीचे बरोबर आहे, चतुर्थ शरीर व मन मजबूत राहण्यासाठी रोज व्यायाम करा आणि आयुष्यभर शिकत रहा. या पंचसुत्रांच्या आधारे मनःशांती मिळते” असा सल्ला महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गप्पाष्टककार डॉ. संजय उपाध्ये यांनी दिला.
स्व. मनसुखलालाजी गुगळे स्मृतीप्रित्यर्थ तनुश्री गर्भसंस्कार परिवारातर्फे न्यू सांगवी येथील साई चौक स्थित संस्कृती लॉन्समध्ये आयोजित कार्यक्रमात प्रसिद्ध गप्पष्टककार व अष्टपैलू व्यक्तिमत्व डॉ. संजय उपाध्ये यांना पहिला ‘तनुश्री जनसंस्कार पुरस्कार’ डॉ. सुप्रिया गुगळे, डॉ. अनिल गुगळे व डॉ. तन्वी गुगळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. तसेच ‘ मुद्रा शक्ती’ पुस्तकाचे प्रकाशन डॉ. गोपल बोहरा, अनिल शर्मा व मान्यवरांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी मंचावर अभिनेत्री शिवानी सोनार, डॉ. यश वेलणकर, अभिनेत्री गार्गी फुले, अभिनेत्री प्राजक्ता हनमघर, बालकलाकार अन्यया टेकावडे , वैद्य सुनीमय दामले, डॉ. सुगंधा रानडे, ब्रह्माकुमारी संजीवनी दीदी, डॉ. अनुप भारती उपस्थित होते.
डॉ. संजय उपाध्ये म्हणाले, “जीवनात खूप मोठे तत्वज्ञानी बनण्यापेक्षा विनोदी बना. माणसाने रसग्रहण करण्याची क्षमता वाढवावी. मन अप्रसन्न होण्याच्या प्रमुख कारणांमध्ये आपल्या मनासारखे न घडणे, स्वतःची इमेज झटकून सर्वांमध्ये न मिसळणे आणि घरातील वर्तमानपत्र मन प्रसन्न करत नाही. जीवनात श्वास, विश्वास आणि आत्मविश्वास अत्यंत महत्वाचा आहे. ”
डॉ. सुप्रिया गुगळे म्हणाल्या,”मोबाइलच्या काळात मानवाचा एकमेकांशी सूर हरविला आहे. तो सूर शोधण्यासाठी अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तनुश्री परिवार हा सर्वाच्या मनाच्या ठाव घेऊन स्वतःशी संवाद साधण्यासाठी कार्य करीत आहेत.”
डॉ. अनुप भारती म्हणाले, “मोबाइल ने ब्रेन कॅप्चर केला आहे. लहान मुलांचा मेंदू पूर्ण प्रगत न झाल्याने त्यांना योग्य व अयोग्याचे निर्णय घेता येत नाही. रिल्समुळे व्यक्ती हा आभासी जगात वावरतांना दिसतो. त्यातच सोशल मिडिया मानवाला बोथट करीत आहे. मोबाइलमुळे संशयीपणा, मानसिक आजार हे वाढतांना दिसत आहेत. त्यामुळे या पासून दूर रहा.”
डॉ. यश वेलणकर म्हणाले,”सतत विचार करीत राहणे ही आजच्या काळातील सर्वात मोठी समस्या आहे. त्यातच मोबाइलमुळे ओव्हर थिंकिंग वाढत आहे. अशा वेळेस सजगता आणि भान ठेऊन मन प्रसन्न ठेवता येते.”
त्यानंतर अभिनेत्री प्राजक्ता हनमघर, अभिनेत्री गार्गी फुले, अभिनेत्री शिवानी सोनार, वैद्य सुविनय दामले, डॉ. तन्वी गुगळे व अन्य मान्यवरांनी आपले विचार मांडले.
या प्रसंगी किशोर खाबिया, शुभांगी दामले,विजय जकातदार, प्रविण खाबिया, उषा जैन यांच्या सहित अन्य व्यक्तिंचाही सत्कार करण्यात आले.
या नंतर ‘मिले सूर हमारा तुम्हारा’ या अनोख्या थीमच्या माध्यमावर गाण्यांचा कार्यक्रम झाला.
डॉ. भाग्यश्री कश्यप यांनी सूत्रसंचालन केेले. श्री. मुनोत यांनी आभार मानले.
मन प्रसन्न ठेवण्यासाठी पंच सुत्रांचा आधार घ्यावा- तनुश्री गर्भसंस्कारतर्फे आयोजित कार्यक्रमात गप्पाष्टककार डॉ. संजय उपाध्ये यांचा सल्ला
Date:

