जालना: राज्य सरकारनं जरांगे आणि समर्थकांच्या पवित्र्याची दखल घेत छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यात इंटरनेट बंद केलं आहे.तसेच मनोज जरांगेंचे तीन शिलेदार देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत.
जरांगे हे अंतरवली सराटी पासून दहा ते बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या भांबेरी गावात रात्री मुक्कामाला होते. आज सकाळीच जरांगे यांचे तीन समर्थक शैलेंद्र पवार, बाळासाहेब इंगळे आणि शिवबा संघटनेचे श्रीराम कुरणकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात हे सहकारी सक्रीय आहेत. जरांगें यांनी मुंबईला जाण्याचा निर्धार केल्यानंतर हे तिघेही मुंबईला जाण्याच्या तयारीला लागली होते. यामुळेच आज २६ फेब्रुवारी सकाळी या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
राज्य सरकारनं अंबड तालुक्यात संचारबंदी लागू केली आहे.
मराठा आंदोलकांनी जालन्यात एसटी बस पेटवून दिली. त्यामुळे मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील तीन जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर , जालना आणि बीड जिल्ह्यातील इंटरनेट सेवा 10 तास बंद राहणार आहे. याबाबत गृह विभागाच्या अप्पर मुख्य सचिव सुजाता सैनिक यांनी आदेश काढले आहेत. सुरक्षेचा उपाय म्हणून जालना, बीड आणि संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत.दुसरीकडे, घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथे मराठा आंदोलकांनी एसटी बस पेटवली. घटनेनंतर सध्या तीर्थपूरी मार्केट बंद करण्यात आले आहे. बसला आग लावल्याच्या घटनेनंतर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने पुढील सूचना मिळेपर्यंत जालन्यातील बस फेऱ्या बंद केल्या आहेत. तसंच एसटी जाळल्याच्या घटनेनंतर ‘एमएसआरटीसी’च्या अंबड आगार व्यवस्थापकांनी स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.जालनाचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी अंबड तालुक्यात संचारबंदी लागू केली आहे. सोमवारी मध्यरात्री एक वाजल्यापासून अंबड तालुक्यामध्ये संचारबंदी लागू केली आहे. मात्र आज सकाळी संचारबंदीमुळे मनोज जरांगे यांनी मुंबईला जाण्याच्या निर्णयावरून माघार घेतली आहे. तसेच मराठा बांधवांना त्यांनी घरी परतण्याचे आवाहन केले आहे.पोलिसांकडून मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांची धरपकड सुरू झाली आहे. रविवारी रात्री पोलिसांनी मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांसह एकूण 5 लोकांना ताब्यात घेतले आहे.

