मुंबई-मला जरांगे यांच्यावर बोलायचे नाही. सध्या माझा 2 जुन्या नाटकांचा अभ्यास सुरू आहे. एक डॉक्टर काशिनाथ घाणेकर यांचे गृह खात्याला जेव्हा जाग येते आणि दुसरे म्हणजे सीमेवरून परत जा. या 2 नाटकांच्या जुळवाजुळवीचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे मला या मुद्यावर बोलण्यास वेळ नाही, असे राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले.आपल्या या वक्तव्याद्वारे त्यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व मनोज जरांगे पाटील यांना टोला हाणला आहे.
मनोज जरांगे मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण देण्याच्या मु्द्यावरून चांगलेच आक्रमक झालेत. त्यांनी रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तुफान टीका करत तावातावाने मुंबईच्या दिशेने निघाले. पण आता पोलिसांनी संचारबंदी लागू केल्यामुळे त्यांना सोमवारी पुन्हा आंतरवाली सराटीत परतावे लागले. यामुळे ते काहीसे बॅकफुटवर गेल्याचे चित्र आहे. ते सायंकाळी आपली पुढील दिशा स्पष्ट करतील. दुसरीकडे, मनोज जरांगे यांच्या या स्थितीविषयी पत्रकारांनी छगन भुजबळ यांना छेडले असता त्यांनी आपल्याला जरांगेंच्या मुद्यावर बोलण्यास वेळ नसल्याचे स्पष्ट केले.
मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावर बोलण्यास नकार दिला. पण त्याचवेळी त्यांनी त्यांना उपरोधिक टोलाही हाणला. सध्या अधिवेशन सुरू आहे मला तिकडे पाहू द्या.
उल्लेखनीय बाब म्हणजे छगन भुजबळ यांनी रविवारीच मनोज जरांगे यांचे पितळ उघडे पडत असल्यामुळे ते आक्रमक होत असल्याचा दावा केला होता. मराठा समाजाला विधिमंडळात एकमताने स्वतंत्र आरक्षण दिले आहे. त्यामुळे आता जरांगेंनी अशी आदळ आपट करण्याचे काय कारण आहे? ता त्यांचेच लोक त्यांच्या विरोधात आरोप करत आहेत. कदाचित त्यामुअळेच त्यांनी हे आकांडतांडव सुरू केले आहे. आता त्यांचे पितळ उघडे पडत चालले आहे. त्यात त्यांनी केलेल्या गुप्त बैठका, फिरवलेले निर्णय, मराठा समाजाची केलेली दिशाभूल, हे सर्व काही उजेडात येत आहेत. यामुळे रक्तदाब वाढल्यामुळे ते असे बोलत असावेत, असे भुजबळ यांनी म्हटले होते.
मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला बदनाम करण्याचा, सलाईनमधून विष द्यायचा व एन्काउंटरमध्ये ठार मारण्याचा कट रचला आहे, असे ते म्हणाले होते. त्यानंतर त्यांनी फडणवीसांना माझा बळी हवा असेल तर मीच त्यांच्यापुढे जाऊन उभा राहतो, असे म्हणते ते अचानक मुंबईतील फडणवीस यांच्या सागर बंगल्याच्या दिशेने निघाले होते. पण सोमवारी राग शांत झाल्यानंतर ते पुन्हा आंतरवाली सराटीत परतलेत.

