विक्रोळीतील भूमिपूजन सोहळ्यात भाजपा आ. प्रविण दरेकरांचे प्रतिपादन
मुंबई- विक्रोळी (पूर्व) कन्नमवार नगर येथील गुरुकुल सहकारी गृहनिर्माण संस्था. मर्या. इमारतीचा मुंबई जिल्हा बँकेच्या सहकार्याने स्वयंपुनर्विकासांतर्गत भूमिपूजन सोहळा आज भाजपा विधानपरिषद गटनेते आणि मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांच्या शुभहस्ते पार पडला. ‘स्वयंपुनर्विकास’ हे मुंबईच्या हौसिंग सेक्टरमध्ये वेगळे परिवर्तन करणारे एक अभियान असल्याचे प्रतिपादन आ. दरेकर यांनी यावेळी केले.
याप्रसंगी मुंबई जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, मुंबई बँकेचे संचालक पुरुषोत्तम दळवी, माजी नगरसेवक उपेंद्र सावंत, राजेंद्र सावंत, गुरुकुल सहकारी संस्थेचे अध्यक्ष प्रविण जाधव, सचिव कविता कामेरकर, खजिनदार नामदेव ढगे यांसह रहिवासी उपस्थित होते.
यावेळी बोलताना दरेकर म्हणाले की, स्वयंपुनर्विकास हे एक अभियान म्हणून मी मुंबईत सुरू केले. आपला सर्वसामान्य मराठी माणूस विशेषतः या इमारतींमध्ये राहतो आणि आपण बिल्डरच्या दावणीला बांधले जातो. मग आपल्याला अपेक्षित असणारी जागा मिळत नाही. त्यामुळे सर्व सभासदांची हेळसांड होते. त्यांच्या अडचणी सोडवल्या तर मराठी, मध्यमवर्गीय माणूस स्वतःची संस्था स्वतः विकसित करू शकतो. या भावनेतून मुंबई जिल्हा बँकेने कर्जाचे धोरण बनविले. स्वयंपुनर्विकासाचे धोरण आणले. आज मोठ्या प्रमाणावर अर्थपूरवठा करून एक चळवळ म्हणून स्वयंपुनर्विकास या मुंबई शहरात उभी राहिली असल्याचे दरेकर म्हणाले.
दरेकर पुढे म्हणाले की, प्रत्येक माणसाच्या आयुष्यातील स्वप्न हे आपले घर असावे असते. ५०-५० वर्ष मोडकळीस आलेल्या इमारतीत आपण राहतो. कुटुंब, संसार वाढतो आणि त्यावेळेला मोठी जागा मिळणे ही अपेक्षा असते. म्हणून स्वयंपुनर्वीकासातून ती अपेक्षा निश्चितपणे पूर्ण होणार आहे. गुरुकुल सोसायटीत साडेपाचशे स्क्वे. फुटाच्या जागा होत्या. आता तुम्हाला जवळपास बाराशे स्क्वे. फुटाची जागा या स्वयंपुनर्विकासातून मिळणार आहे. विकासक कधीच आपल्याला एवढी जागा देऊ शकत नाही. त्यामुळे हा एक विक्रम असल्याचे दरेकर म्हणाले. तसेच मुंबई बँकेने ज्या १५-१६ संस्थांना पैसे दिलेत त्या उभ्या राहिल्या आहेत. या अभियानात एक वेगळा आनंद आम्हाला असल्याचेही दरेकरांनी म्हटले.
दरेकर म्हणाले की, स्वयंपुनर्विकास मुंबईच्या हौसिंग सेक्टरमध्ये वेगळे परिवर्तन करणारे अभियान आहे. दोन दिवसांपूर्वी ज्यांनी खऱ्या अर्थाने या स्वयंपुनर्विकासाला ताकद दिली ते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘धन्यवाद देवेंद्रजी’ कार्यक्रमात मुंबईकरांनी अभूतपूर्व अशी गर्दी केली होती. त्यामुळे आमचाही आत्मविश्वास वाढला आहे. कितीही प्रकल्प आले तरी त्यांना अर्थपूरवठा करण्याची जबाबदारी मुंबई जिल्हा बँक म्हणून आम्ही घेऊ. तसेच आपण विश्वासाने हे स्वयंपुनर्विकासाचे काम पुढे न्या आपल्या पाठीशी मुंबई जिल्हा बँक आणि राज्य सरकार ताकदीने पाठीशी राहील, असा विश्वासही दरेकरांनी यावेळी उपस्थितांना दिला.

