श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या वतीने आयोजन : राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा
पुणे : श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या वतीने आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, दिनांक २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता स्पर्धेचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ.सदानंद भोसले यांच्या हस्ते होणार आहे. शुक्रवार पेठेतील समाजभूषण बाबुराव उर्फ अप्पासाहेब जेधे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे ही स्पर्धा होईल. अशी माहिती स्पर्धा संयोजक आणि महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. दिपाली आर. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी डॉ. अमित गोगावले उपस्थित होते.
डॉ. दिपाली पाटील म्हणाल्या, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये सामाजिकतेचे भान आणि जाण निर्माण होण्याच्या हेतूने व युवकांमध्ये वक्तृत्व व नेतृत्व गुण विकसित होण्याच्या दृष्टिकोनातून राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेचे हे द्वितीय वर्ष आहे.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता टिळक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.राधिका इनामदार यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र जगताप, मानद सचिव अण्णा थोरात, सहसचिव विकास गोगावले, खजिनदार जगदीश जेधे उपस्थित राहणार आहेत.
स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला ११ हजार, द्वितीय क्रमांकाला ७ हजाराला, तृतीय क्रमांकाला ५ हजार आणि ५ उत्तेजनार्थ क्रमांकाना प्रत्येकी १ हजार रोख आणि स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
मोठ्या संख्येने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी प्रा. सीमा ढमे ९६५७६८९१९१, संतोष यादव ९७६७९०३९६, डॉ.अमित गोगावले ९९२२०७४८४७ या क्रमांकावर संपर्क साधावा.

