‘स्पर्धा परीक्षा वास्तव आणि तरुणांची मानसिकता’वर परिसंवाद
पुस्तकविश्व प्रकाशन, उचित माध्यम, एमपीएससी स्टुडंट्स फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन
पुणे, ता. १६ : “स्पर्धा परीक्षांमधील यश म्हणजेच आयुष्याचे अंतिम ध्येय नाही. त्यापलीकडेही एक जग असून, एक चांगला माणूस म्हणून प्रत्येकजण सकारात्मक बदल घडवू शकतो. त्यासाठी केवळ प्रशासकीय अधिकारीच झाले पाहिजे असे नाही. केवळ एका परीक्षेसाठी आयुष्य पणाला न लावता विद्यार्थ्यांनी वास्तवाचे भान राखावे,” असा सल्ला बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण प्रकल्प संचालक कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिला.
पुस्तकविश्व प्रकाशन, उचित माध्यम आयोजित एमपीएससी स्टुडंट्स फोरम- वास्तव कट्टा यांच्या सहकार्याने ज्ञानेश्वर जाधवर लिखित रुद्र इंटरप्राईजेस प्रकाशित, ‘आशेच्या गुंगीत लटकलेलं तारुण्य’ या कादंबरीच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन दिवेगावकर यांच्या हस्ते झाले. जेष्ठ संपादक अरुण खोरे यांच्या अध्यक्षतेखाली ‘स्पर्धा परीक्षा वास्तव आणि तरुणांची मानसिकता’ या विषयावरील परिसंवादात उद्योजक रणजीतसिंह पाटील, डीडी सह्याद्री व आकाशवाणी पुणे केंद्राचे संचालक इंद्रजीत बागल, पत्रकार हलीमा कुरेशी यांनी विचार मांडले. पुस्तकविश्व प्रकाशनचे नवनाथ जगताप, उचित माध्यमचे प्रमुख जीवराज चोले, वास्तव कट्टाचे महेश बडे, किरण निंभोरे उपस्थित होते.
कौस्तुभ दिवेगावकर म्हणाले, “प्रशासकीय अधिकारी म्हणजे केवळ सत्कार, ग्लॅमर हा समज दूर झाला पाहिजे. हे पद एक जबाबदारी, समाज बदलण्याची ताकद आहे. या समाजामध्ये सकारात्मक बदल घडविण्यासाठी प्रत्यक्ष अधिकारीच झाले पाहिजे असे नाही. एक चांगला माणूस म्हणूनही आपण त्यामध्ये बदल घडवून आणू शकतो. स्पर्धा परीक्षा देताना आपण अंतिम ध्येय गाठू शकलो नाही, तरी इतर पर्याय समोर ठेवून त्यामध्ये यश मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत.”
अरुण खोरे म्हणाले, “अधिकाऱ्यांनी केवळ सर्वसामान्य माणसाच्या फाईल वाचू नये, तर त्या फायलींमध्ये माणसाचा चेहरा त्या अधिकाऱ्यांना दिसला पाहिजे. तेव्हाच तो अधिकारी माणसांचे प्रश्न सोडवू शकतो हे यशवंतराव चव्हाण यांचे विचार अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष आयुष्यात अमलात आणले, तर सकारात्मक बदल घडू शकेल. देशातील लोकशाही मजबूत करण्यासाठी ज्याप्रमाणे चांगल्या अधिकारी, चांगले पत्रकार व चांगल्या नागरिकांची गरज आहे.”
इंद्रजीत बागल म्हणाले, “स्पर्धा परीक्षा देताना निश्चित ध्येय विद्यार्थ्यांनी डोळ्यासमोर ठेवले पाहिजे, जरी त्यामध्ये यश मिळाले नाही तरी ठराविक कालावधीनंतर इतर पर्याय पर्यायांचा विचार केला पाहिजे. स्पर्धा परीक्षा देण्यापूर्वी स्वतःचे क्षमता लक्षात घेऊन ध्येय निश्चित करत चिकाटीने मार्गक्रमण केल्यास यश निश्चित मिळते.”
रणजीत सिंग पाटील म्हणाले, “अधिकारी होण्यासाठी जसा संघर्ष करावा लागतो, तसाच कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. विद्यार्थ्यांनी केवळ स्पर्धा परीक्षा अंतिम ध्येय न समजता इतर क्षेत्रांचाही विचार केला पाहिजे.”
ज्ञानेश्वर जाधवर म्हणाले, “भवतालचे वातावरण, अनुभव टिपणारी व वास्तवाचे भान सांगणारी ही कादंबरी आहे. तरुणांनी स्पर्धा परीक्षांच्या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी पर्यायी व्यवस्था शोधली पाहिजे.”
हलीमा कुरेशी म्हणाल्या, “अधिकारी बनून समाजाच्या सेवेत जसे योगदान देऊ शकतो, तसेच पत्रकारितेच्या व अन्य क्षेत्रात भरीव योगदान देऊन सर्वसामान्य माणसांना न्याय देण्याचे काम करता येते.”
नवनाथ जगताप म्हणाले, “यशोगाथा सर्वांनाच आवडते. परंतु हे यश जर मिळाले नाही, तर इतर पर्याय कोणते असावे याचा विचार स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी केला पाहिजे, हे सांगणारी ही कादंबरी आहे.”
पुस्तक निर्मितीसाठी सहकार्य केल्याबद्दल प्रशांत बागल सचिन म्हसे, अभिजीत सोनवणे, वैभव साळुंखे, चंद्रकांत अडसूळ, गणेश पवार यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

