‘डीपफेक’ बाबत सरकार लवकरच कायदा तयार करणार; महिलांनी सायबर गुन्ह्यांपासून दक्ष रहावे
मुंबई दि.२५: रेल्वे प्रशासनाकडून महिलांना सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी स्त्री आधार केंद्राच्या वतीने कार्य सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये संस्थेच्या महिला रेल्वे स्टेशनवर जाऊन पाहणी करतील तेथील महिलांशी संवाद साधतील. स्त्रियांच्या समस्या सोडवण्यासाठी काम करतील. तसेच ‘डीपफेक’ मध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून खोटे फोटो व्हिडीओ तयार केले जात आहेत. याबाबत महिलांनी सावध असावे. यावर कायदा तयार करण्याचे सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचे विधानपरिषद उपसभापती तथा स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.
स्त्री आधार केंद्रातर्फे जागतिक महिलांवरील हिंसाचार विरोधी दिनानिमित्ताने दि. २५ नोव्हेंबर २०२३ ते ११ डिसेंबर २०२३ रोजी पोस्टर प्रदर्शन व चर्चा सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उदघाटन स्त्री आधार केंद्र अध्यक्षा व विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते झाले त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, संयुक्त राष्ट्रसभेच्या आमसभे तर्फे दरवर्षी २५ नोव्हेंबर हा दिवस महिलांवरील हिंसाचार थांबविण्यासाठी ‘ऑरेंज डे’ नावाने साजरा केला जातो. स्त्री आधार केंद्राच्यावतीने देखील तो स्त्रियांच्या प्रश्नांबात जनजागृती करत साजरा करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
महिलांवरील हिंसाचार अद्यापही थांबवता आलेला नसून त्याला काही कारणे असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये, या विषयावर एकतर कोणीही न बोलणे तसेच जो बोलतोय त्याचं यातील स्थान काय असा प्रश्न विचारला जातो, बलात्कार, लैगिक अत्याचार या विषयावर बोलायची लाज वाटणे यामुळेच त्यासर्वाची खुलेपणाने चर्चा व्हावी यासाठी ‘ऑरेंज डे’ हा कार्यक्रम आयोजीत करण्यात येत असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
संस्थेच्या कामाला अधिक व्यापक करणे गरजेचे आहे. दुष्काळ निवारण्यासाठी जे रोजगारपूरक कार्यक्रम आहेत ते सुरू व्हावेत यासाठी दोन डिसेंबर रोजी पुणे येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी श्यामल देसाई यांनी घनकचरा स्वच्छता व पर्यावरणाची दिशा आणि स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त अपर्णा पाठक यांनी शाश्वत विकास उद्दिष्टे व महिला सक्षमीकरण या विषयावर आपले विचार मांडले.
या प्रसंगी स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त जेहलम जोशी, अनिता शिंदे, शोभा कोठारी, मीना इनामदार, सविता लांडगे यांसह अनेक महिला उपस्थित होत्या.

