लोहमार्ग पोलीस अधीक्षकांना दिले निवेदन
मुंबई : मिरज रेल्वे स्टेशननजीक एका नवविवाहित महिलेवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना दिनांक ७ जानेवारी पासून सलग पाच दिवस घडली आहे. ७ जानेवारी ते ४ फेब्रुवारी दरम्यानच्या घटनाक्रमामध्ये पिडीतेवर वारंवार सामूहिक अत्याचार, त्यांनतर परराज्यात विक्री करून तिचे लग्न अशा घटना घडल्या आहेत. घटनेतील पीडित महिला २३ वर्षे वयाची नवविवाहित असून लग्नास ८ महिने झाले आहेत. मिरज रेल्वे स्टेशननजीक आरोपीने मदतीचा बहाणा करून निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार केला आहे. सदर घटनेतील ७ आरोपींना पोलिसांनी तात्काळ अटक केली. अजून एका आरोपी महिलेचा शोध सुरू आहे. सदर घटनेतील आरोपींना मदत करणाऱ्या अजून एका महिलेचा त्वरित शोध घेऊन कडक कारवाई करण्यात यावी. तसेच रेल्वे, बसस्थानक यांच्या ठिकाणची महिलांच्या संदर्भातील सुरक्षेची यंत्रणा अधिक कार्यान्वित होणे गरजेचे असल्याचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी निवेदनात म्हटले आहे.
तसेच याबाबत संबंधित अधिकारी यांना योग्य आदेश देण्यात येऊन, रेल्वे स्टेशनवरील मदतकक्ष अधिक कार्यक्षम कऱण्यात यावीत. तसेच घटनेच्या आधीचे रेल्वे स्थानकावरील CCTV फुटेज तपासण्यात यावेत. रेल्वे स्टेशन वरती महिला पोलिसांची यंत्रणा कार्यान्वित करण्यात यावी. रेल्वे, बस प्रवासात दिशाभूल करून फसवणुक होण्याच्या घटनांना आळा बसण्यासाठी त्यांच्या विरोधातील रेल्वे पोलीस परिवहन विभाग, पोलीस विभाग, महिला बाल विकास विभाग यांची पथके असणे गरजेचे आहे. आरोपींवर अधिक कडक कलमे लावून कारवाई करण्यात यावी. जामीनास कसून विरोध करण्यात यावा. संबंधित पीडितेला समुपदेशनाची आवश्यकता आहे ते करण्यात यावे. पीडितेला मनोधैर्य योजनेतून मदत मिळवून देण्यात यावी. अशा मागण्या उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी निवेदनात केल्या आहेत.
सदर घटनेबाबत, पोलीस आयुक्त लोहमार्ग, अप्पर मुख्य सचिव गृह विभाग, प्रधान सचिव महिला व बाल विकास विभाग, आयुक्त महिला व बाल विकास विभाग, आयुक्त सामाजिक न्याय विभाग यांना देखील निवेदन देण्यात येणार असल्याचे उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.