नागपूर/अमरावती
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अधीन असलेल्या भारतीय जन संचार संस्थान- आयआयएमसी अमरावती मध्ये मराठी पत्रकारिता पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. शैक्षणिक सत्र २०२४-२५ साठी आयोजित या प्रवेश प्रक्रियेत अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २९ फेब्रुवारी २०२४ असून प्रवेश अर्ज संस्थान च्या www.iimc.nic.in या अधिकृत वेबसाइट वर उपलब्ध आहे.
पत्रकारिता अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थांनी आयआयएमसीच्या अधिकृत वेबसाइट वरून प्रवेश अर्ज डाउनलोड करावा. भरलेल्या अर्जाची प्रत आयआयएमसी दिल्ली येथे पोस्टाद्वारे पाठविणे अनिवार्य आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची सामायिक चाचणी परीक्षा घेण्यात येणार असून ही परीक्षा दिनांक १० मार्च रोजी भारतीय जन संचार संस्थानच्या अमरावती विद्यापीठ परिसरातील पश्चिम क्षेत्रीय केंद्रावर आयोजित करण्यात येणार आहे.
मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी प्राप्त विद्यार्थी आयआयएमसीमध्ये पत्रकारिता अभ्यासक्रमाला प्रवेशासाठी अर्ज करू शकतात.जे विद्यार्थी त्यांच्या बॅचलर पदवीच्या अंतिम वर्षात किंवा सेमिस्टर परीक्षेत बसले आहेत किंवा जे विद्यार्थी परीक्षा देणार आहेत ते देखील अर्ज करण्यास पात्र आहेत. निवड झाल्यावर, अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या तात्पुरत्या मार्कशीटची किंवा प्रमाणपत्राची मूळ प्रत 30 सप्टेंबर 2024 पर्यंत सादर करावी लागेल. प्रवेश करिता वयोमर्यादा निश्चित करण्यात आली असून खुल्या प्रवार्गासाठी २५ वर्ष, ओबीसी करिता २८ वर्ष तर अनुसूचित जाती / जमाती आणि दिव्यांग उमेदवारा करिता ३० वर्ष आहे.
इच्छुक उमेदवारांनी प्रवेश परीक्षेशी संबंधित अपडेटसाठी आयआयएमसीच्या वेबसाइटला भेट देण्याचे आवाहन प्रवेश प्रभारी प्रो. राकेश गोस्वामी यांनी दिला आहे. प्रवेश प्रक्रिया संबंधी अधिक माहितीसाठी किंवा अडचणी संदर्भात विद्यार्थांनी डॉ. विनोद निताळे (9860046706), डॉ. आशिष दुबे (9923196709), चैतन्य कायंदे पाटील(7972317210), संजय पाखोडे (9823023875) राजेश झोलेकर (9881388645) यांच्याशी दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा, अशी माहिती संस्थानचे क्षेत्रीय संचालक डॉ. राजेश सिंह कुशवाहा यांनी दिली आहे.
आयआयएमसीला आता अभिमत विद्यापीठ
शिक्षण मंत्रालयाने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (UGC) सल्ल्यानुसार, भारतीय जनसंवाद संस्था, या पत्रकारिता आणि जनसंवाद क्षेत्रातील शिक्षणासाठी एक अग्रगण्य संस्थेला विशिष्ट श्रेणीतील अभिमत विद्यापीठ म्हणून घोषित केले आहे. हा दर्जा आयआयएमसी नवी दिल्ली तसेच जम्मू (जम्मू आणि काश्मीर), अमरावती (महाराष्ट्र), ऐझवाल (मिझोरम), कोट्टयम (केरळ) आणि ढेंकनाल (ओडिशा) इथे असलेल्या पाच प्रादेशिक संस्थांनाही प्रदान करण्यात आला आहे.
या नवीन दर्जासह भारतीय जनसंवाद संस्था आता डॉक्टरेट पदवीसह इतर पदवी प्रदान करण्यासाठी अधिकृत संस्था असेल.