पुणे- दुकानांच्या पाट्या मराठीत च असाव्यात या न्यायालयीन आदेशाच्या मुद्द्यावरून पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांना मनसे ने टार्गेट केले आहे. आपल्या अधिकाऱ्यांना मराठी भाषेचा अभिमान व आपल्या कर्तव्याचे भान उरलेले नाही असा आरोप करत उद्यापर्यंत पुण्यातील सर्व दुकानांच्या , कंपन्यांच्या , व्यावसायिकांच्या पाट्या मराठीत दिसल्या नाहीत तर आमच्या स्टाईल ला सामोरे जाण्याची तयारी ठेवा ,मागाहून तक्रार करू नका ,आणि सांगितले नाही म्हणू नका असा स्पष्ट इशारा मनसेने आज येथे दिला आहे.
मनसेने महापालिका आयुक्तांना दिलेल्या पत्रकात असे म्हटले आहे कि,’आपल्या पुणे शहरातील व उपनगरातील भागात आपल्या अधिकार क्षेत्रातील दुकाने व आस्थापना वरील पाट्या मराठी भाषेत नसल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निदर्शनास आले असून आपल्या शॉप अॅड एस्ट्याब्लिशमेन्ट कायद्यातील तरतुदी नुसार दुकाने व आस्थापने वरील पाट्या मराठी भाषेतच असणे बंधनकारक आहे परंतु अनेक दुकानदार व आस्थापना प्रचलीत कायदेशीर तरतुदींचा सरस भंग करीत आहेत. सदरील बाब अतिशय गंभीर असून आपल्या कार्यालयाकडूनही याकडे डोळेझाक करण्यात येत आहे. आपल्या कार्यालयातील अधिकाऱ्यांना आपल्या मराठी भाषेचा अभिमान व आपल्या कर्तव्याचे भान नसल्याचे दिसत आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने दोन महिन्यांत सर्व पाट्या दुकानदारांनी मराठी स्थानीक भाषेत करावेत या आदेशाची मुदत दिनांक २५ नोव्हेंबर २०२३ रोजी संपत आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार प्रत्येक प्रांतातील त्या भाषेमध्येच म्हणजे महाराष्ट्रात दुकानावरील पाटया मराठीतच असाव्यात असा निर्णय देण्यात आला तरी सर्वोच्च न्यायालयाचा आदर ठेवून आपण आपल्या पुणे शहरातील व उपनगरातील भागात सर्व दुकानदाराना व आस्थापना यांना कायदेशीर तरतुदी नुसार कार्यवाही करण्यात यावी तसेच सर्व पाट्या मराठी भाषेत मोठ्या अक्षरातच आहेत का नाही याची तपासणी करण्यात यावी. सदर पत्राने आपणांस कळविण्यात येते कि स्थानिक प्रशासनाने तातडीने दुकानदाराना व आस्थापना यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई करावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या निष्क्रीय प्रशासनाच्या व सर्व दुकानदाराच्या विरोधात तिव्र आंदोलन छेडेल याची आपण गांभीर्याने दखल घ्यावी. हि विनंती.

