मुंबई- मंत्रालयातील लाचखोरीचा सिलसिला थांबण्याचे नाव घेत नाहीये. काही दिवसांपूर्वीच एका मंत्र्यांच्या स्वीय सहायकाला लाच घेताना अटक करण्यात आली होती, ती घटना ताजी असतानाच आता मंत्रालयातील एका बड्या माशावर ‘एसीबी’ने (लाचलूचपत प्रतिबंधक विभाग) मोठी कारवाई केली आहे. अर्थ व नियोजन विभागातील कक्ष अधिकारी विलास लाड यांना ६ लाख ३७ हजार रुपयांची भरभक्कम लाच स्वीकारताना खारघर परिसरात रंगेहाथ पकडण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, ग्रामविकास विभागाचा प्रलंबित निधी मंजूर करून देण्यासाठी कक्ष अधिकारी विलास लाड यांनी लाचेची मागणी केली होती. लाचेची ही रक्कम ६ लाख ३७ हजार ५०० रुपये इतकी मोठी होती. नवी मुंबईतील खारघर परिसरात लाचेची ही रक्कम स्वीकारण्यासाठी लाड आले असता, एसीबीने रचलेल्या सापळ्यात ते अलगद अडकले. एका सामान्य माणसाचा वर्षाचा पगारही नसेल, एवढी मोठी रक्कम हा अधिकारी एकाच कामासाठी लाच म्हणून घेत होता, हे विशेष.
मार्च महिन्यात एसीबीने मंत्रालयात केलेल्या कारवायांच्या धडाक्यानंतर, प्रशासकीय वर्तुळात अशी चर्चा होती की ही केवळ ‘मार्च एंडिंग’ची धावपळ आहे. मात्र, एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात विलास लाड यांच्यावर झालेली ही कारवाई पाहता, एसीबीने आपला मोर्चा आता कायमस्वरूपी मंत्रालयातील भ्रष्टाचाराकडे वळवल्याचे स्पष्ट झाले आहे. मंत्रालयासारख्या उच्च सुरक्षा आणि जबाबदारीच्या ठिकाणी बसून खुलेआम चालणाऱ्या या व्यवहारांमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
मंत्रालयात बसून सर्वसामान्यांच्या फाईली अडवून पैसे उकळण्याचा प्रकार नवीन नसला, तरी एका दिवसात एका वर्षाच्या पगारापेक्षा मोठी रक्कम लाच म्हणून घेण्याचे धाडस पाहून अधिकारी वर्गही अवाक झाला आहे. लाड यांच्या अटकेमुळे मंत्रालयातील अर्थ, नियोजन आणि ग्रामविकास विभागातील इतर संशयास्पद व्यवहारांचीही चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
खारघरमधील या कारवाईमुळे लाचखोरांचे धाबे दणाणले असून, “प्रशासनातील पारदर्शकता केवळ कागदावरच आहे का?” असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होत आहे. सध्या आरोपी विलास लाड यांची कसून चौकशी सुरू असून, त्यांच्या संपत्तीचीही तपासणी केली जाण्याची शक्यता आहे.

