श्री जंगली महाराज देवस्थान ट्रस्ट, पुणेच्या वतीने व्याख्यान
पुणे : महाराष्ट्रातील गड-किल्ले हे केवळ ऐतिहासिक वास्तू नसून त्यांच्या मागे मोठे सामरिक महत्त्व दडलेले आहे. घाटमाथ्यावरचे, किनाऱ्यावरील तसेच जलदुर्ग अशा विविध प्रकारच्या किल्ल्यांनी मराठा साम्राज्याच्या संरक्षणात मोलाची भूमिका बजावली होती. तामिळनाडूमधील जिंजीसारखा वेगळ्या भूभागावरील किल्लाही याच दृष्टीने विशेष महत्त्वाचा मानला जातो.
किल्ल्यांचे संवर्धन म्हणजे नव्याने बांधकाम करणे नव्हे, तर गडांवर सध्या अस्तित्वात असलेल्या वास्तूंचे जतन आणि संरक्षण करणे होय. ही जबाबदारी केवळ पुरातत्व विभागापुरती मर्यादित नसून प्रत्येक नागरिकानेही यात सक्रिय सहभाग घेणे आवश्यक आहे, असे मत डॉ. सचिन जोशी यांनी व्यक्त केले.
श्री जंगली महाराज देवस्थान ट्रस्ट, पुणेच्या वतीने ‘सद््गुरु श्री जंगली महाराज १३६ वा पुण्यतिथी उत्सव’ साजरा करण्यात येत आहे. या उत्सवात डॉ.सचिन जोशी यांचे शिवछत्रपती यांचे जागतिक वारसा प्राप्त १२ किल्ले या विषयावर यांचे व्याख्यान झाले.
डॉ. सचिन जोशी म्हणाले, ब्रिटिश काळात अनेक किल्ल्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आजही अनेक गड-किल्ल्यांची स्थिती चिंताजनक आहे. मात्र, अलीकडील काळात महाराष्ट्र सरकारच्या प्रयत्नांमुळे युनेस्को ने छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘मराठा मिलिटरी लँडस्केप’ अंतर्गत १२ किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे. यात महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूमधील १ किल्ल्याचा समावेश आहे. रायगड, राजगड, शिवनेरी, सिंधुदुर्ग, प्रतापगड, पन्हाळा, साल्हेर, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी, लोहगड आणि जिंजी हे किल्ले या यादीत समाविष्ट आहेत.
ते पुढे म्हणाले, इतिहासातील एक महत्त्वपूर्ण घटना म्हणजे १८१८ साली ब्रिटिशांनी रायगडावर केलेला हल्ला. या वेळी सुमारे ३००० तोफगोळ्यांचा मारा करण्यात आला होता. तब्बल तीन दिवस रायगड पेटत होता. या आगीत किल्ल्यावरील दप्तरखाना जळून खाक झाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित अनेक मूळ कागदपत्रे नष्ट झाली. त्यामुळे मराठ्यांचा इतिहास लिहिताना आज उपलब्ध असलेल्या सुमारे २५० पत्रांवर आणि इंग्रज, डच, मुघल व पोर्तुगीज यांच्याशी झालेल्या पत्रव्यवहाराच्या प्रतींवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून राहावे लागते.
ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र तांबेकर म्हणाले, दिनांक १ एप्रिल पर्यंत दररोज सकाळी ८ ते १० यावेळेत श्री ज्ञानेश्वरी पारायण आणि सकाळी १० ते सायंकाळी ५.४५ पर्यंत विविध महिला भजनी मंडळांचे भजनाचे कार्यक्रम होणार आहेत. तसेच दि. २६ मार्च रोजी सकाळी ८.३० ते दुपारी २ पर्यंत श्री गजानन महाराज परिवार संघ, पुणे तर्फे श्री गजानन विजय ग्रंथ अखंड पारायण आयोजित करण्यात आले आहे.
बुधवार, दि. १ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता सदगुरु श्री जंगली महाराजांच्या पादुकांचा पालखी सोहळा होणार आहे. त्यानंतर गुरुवार, दि.२ एप्रिल रोजी दुपारी १ नंतर मंदिरात महाप्रसाद देण्यात येईल. उत्सवात भाविकांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

