पुणे, : मुंढवा-केशवनगर ते खराडी बायपास रस्त्यावरील महात्मा फुले चौक येथे उड्डाणपूल बांधण्याच्या प्रस्तावास मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. मगरपट्टा ते खराडी मार्गावरील वाहतूक कोंडी फुटण्यास मदत होणार आहे.स्थायी समिति अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी ही माहिती दिली ते म्हणाले,’मगरपट्टा ते खराडी या मार्गावर मेट्रोचा मार्ग प्रस्तावित आहे. त्यामुळे उड्डाणपुलाच्या वरून मेट्रो लाइन जाणार आहे. उड्डाणपुलाच्या कामाची सुमारे १२० कोटी ११ रुपये किमतीच्या निविदेचा प्रस्ताव प्रशासनाकडून स्थायी समिती समोर मांडण्यात आला होता. याशिवाय, विविध कामांसाठी ९ कोटी ४२ लाख ५३ हजार रुपयांची तरतूद करण्यासही मान्यता देण्यात आली आहे.
या ठिकाणी वाहने व मेट्रो यासाठी दुमजली हा उड्डाणपूल असणार आहे. मेट्रो प्रशासनाशी चर्चा करून काम केले जाणार आहे. पुलाच्या पायाच्या पातळीतील बदल, छताच्या क्षेत्रफळातील बदल तसेच शासनाच्या जीएसटी धोरणातील बदल यानुसारही देयकांमध्ये आवश्यक ते समायोजन केले जाणार आहे. या प्रकल्पामुळे मुंढवा, केशवनगर, खराडी आणि परिसरातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार असल्याचे समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले.
मुख्य पुलाची लांबी ७९६ मीटर
उड्डाणपुलाची एकूण लांबी १ हजार ८० मीटर असून मुख्य पुलाची लांबी ७६९ मीटर इतकी आहे. खराडी बाजूस १३६ मीटर, तर मुंढवा बाजूस १४८ मीटर लांबीचे पोच रस्ते असार आहे. १६ मीटर रुंदीचा हा उड्डाणपूल असून वाहतुकीसाठी स्वतंत्र दुहेरी मार्गिका असणार आहे. या उड्डाणपुलासाठी एकूण ३६ पिअर्स उभारण्यात येणार असून त्यापैकी २८ पिअर्स रस्त्यावर, तर आठ पिअर्स हे नदीपात्रात असतील. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी २४ महिन्यांचा कालावधी निश्चित केला असून पावसाळ्याचा कालावधी त्यातून वगळला आहे.
मुंढवा-केशवनगर ते खराडी बायपास रस्त्यावरील महात्मा फुले चौकात 120 कोटीचा उड्डाणपूल: वाहतूक कोंडी फोडणार-भिमाले
Date:

