पुणे:महापालिकेच्या निवडणुकीत सत्ता आल्यानंतर भाजपने आरपीआयला उपमहापौरपद दिले. पण कधी कधी काही बैठकांना महापौरांच्या शेजारी उपमहापौरांची बसण्याची व्यवस्थाही केली जात नाही.अशी गजब खदखद उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी व्यक्त केली. दरम्यान वाडेकर देखील उपमहापौर पद मिळाल्यावर सिनिअर कार्यकर्त्यांना देखील विचारत नसल्याची चर्चा झडते आहे.जे लोक आज मान-सन्मानाची अपेक्षा करत आहेत, त्यांनी कधी स्वतःच्या पक्षातील सामान्य, प्रामाणिक आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना तो सन्मान दिला आहे का? लहान कार्यकर्ते, नवीन कार्यकर्ते किंवा अगदी वरिष्ठ कार्यकर्त्यांनाही योग्य मान दिला गेला का? असे ही सवाल केले जात आहेत.
दरम्यान, वाडेकर यांनी असेही म्हटले आहे की,शहरातील विविध भागात झालेल्या कार्यक्रमांमध्ये उपमहापौरांसाठी जागा न ठेवल्याने अनेक कार्यक्रमांसाठी प्रेक्षकांमध्ये बसून साक्षीदार झालो. या पदापर्यंत संघर्ष करत आलो. यापुढील काळातही संघर्ष करत राहणार आहे. उपमहापौर पदासाठी दिला जाणारा सन्मान दिला जात नाही.
उपमहापौरपदावर काम करणाऱ्या व्यक्तीला यापूर्वी योग्य मान दिला जात होता. मात्र आता त्या सन्मानाचा विसर पडल्याची तक्रार महापालिकेचे उपमहापौर वाडेकर यांनी केली. वाडेकर यांच्या या विधानाने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध भागात आयोजित करण्यात आलेल्या ‘महापौर चषक क्रीडा’ स्पर्धांच्या निमित्ताने उपमहापौरपदाला जाणीवपूर्वक डावलले जात आहे. महापौर चषक क्रीडा स्पर्धेतील एक स्पर्धा औंध-बोपोडी या प्रभागात आयोजित करूनही त्या कार्यक्रमासाठी उपमहापौर म्हणून डावलण्यात आल्याचे परशुराम वाडेकर यांनी सांगितले. हे प्रकार नजरचुकीने होतात की जाणीवपूर्वक हेच समजत नाही, असेही वाडेकर यांनी सांगितले.

महापालिकेत सत्ताधारी झालेल्या भाजपने मित्रपक्ष असलेल्या आरपीआयच्या नगरसेवकांसाठी उपमहापौरपद सोडले असले तरी या पदासाठी असलेला सन्मान मात्र भाजपकडून मिळत नसल्याचे समोर आले आहे. महापौर कार्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या अनेक कार्यक्रमांना उपमहापौर यांना निमंत्रण पाठविले जात नाही. अनेकदा बैठका होऊन गेल्यानंतर ‘तुम्हाला निमंत्रण देण्यात आले नव्हते का?’ अशी विचारणा महापौरांकडून होते. महापौर कार्यालयातील संबधित व्यक्तींशी बोलून माहिती घेतली जाईल, असे सांगत महापौरांकडून केवळ समजूत काढली जाते. मात्र त्यानंतरही पुन्हा तशाच पद्धतीचे प्रकार घडत असल्याचे उपमहापौर वाडेकर यांनी सांगितले.

