दरवर्षी ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. महिलांच्या हक्कांसाठी, सन्मानासाठी आणि समानतेसाठी सुरू झालेल्या अविरत संघर्षाचे स्मरण देणारा हा दिवस. व्यक्ती, कुटुंब आणि समाजाच्या प्रगतीमध्ये सर्व स्तरांवर महिलांचे योगदान अनन्यसाधारण आहे. घरापासून ते देशाच्या विकासापर्यंत प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपली क्षमता सिद्ध केली आहे. त्या कार्यकर्तृत्वाला सानंद अभिमानाने मानवंदना देण्याचा हा दिवस आहे. २०व्या शतकाच्या सुरुवातीला महिलांनी आपल्या हक्कांसाठी आंदोलन सुरू केले. कामाच्या ठिकाणी समान वेतन, चांगल्या कामाच्या अटी आणि मतदानाचा अधिकार यासाठी सुरवातीला महिलांनी संघर्ष केला. त्या संघर्षातूनच महिला दिनाची परंपरा सुरू झाली. आज हा दिवस केवळ एक उत्सव नसून व्यक्ती म्हणून महिलांच्या सन्मानाचा आणि समानतेचा संदेश प्रत्येकापर्यंत नेणारा दिवस आहे.
आगृहात् आयुद्धपर्यंतम् (घरापासून रणभूमीपर्यंत) जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात महिलांनी यशाची शिखरे गाठली आहेत. शिक्षण, विज्ञान, क्रीडा, उद्योग, राजकारण, प्रशासन अशा विविध क्षेत्रांमध्ये महिलांनी आपल्या कर्तृत्वाने केवळ ओळख निर्माण केली आहे, असे नव्हे तर अमीट असा ठसा उमटवला आहे. कित्येक महिलांनी जगाला दाखवून दिले की, संधी मिळाल्यास त्या कोणत्याही क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची शिखरे उभी करतात.
तरीही आव्हाने कायम…
स्त्रियांच्या प्रगतीच्या गाथा उंचावत असतानाही अनेक आव्हाने कायम आहेत. प्रगतीचा आलेख सर्वत्र समान नाही, हे प्रमुख आव्हान आहे. समाजात अजूनही शिक्षणाच्या आणि रोजगाराच्या संधी, महिलांवरील अत्याचार, सुरक्षिततेचे प्रश्न आणि सामाजिक भेदभाव या समस्या अजूनही गंभीर आहेत. विशेषतः ग्रामीण भागातील महिलांना शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या बाबतीत अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. महिलांचे सर्व क्षेत्रांतील सशक्तीकरण व सक्षमीकरण समाजाच्या समतोल विकासासाठी आवश्यक आहे. महिलांना शिक्षणाच्या संधी मिळाल्या तर आर्थिक स्वावलंबन मिळेल आणि त्या स्वतःबरोबरच कुटुंब आणि समाजही सक्षम करतात, हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे महिलांना समान संधी मिळणे, त्यांचा सन्मान राखणे आणि सुरक्षित भोवताल ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.
समानतेच्या जाणीवजागृतीचा दिवस..
महिला दिन हा केवळ अभिनंदनाचा किंवा शुभेच्छांचा दिवस नसून, समाजातील प्रत्येक महिलेला सन्मानाने आणि समानतेने जगण्याचा अधिकार आहे, या जाणीवजागृतीचा दिवस आहे. स्त्री ही समाजाची शक्ती आहे, पण या शक्तीला स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो. एकेकाळी घराच्या चार भिंतींमध्ये बांधून ठेवलेली स्त्रीशक्ती जरा अवकाश मिळताच शिक्षण, विज्ञान, उद्योग, क्रीडा, राजकारण अशा प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहे. स्त्री हे जिद्द, संघर्ष, परिश्रमांचे दुसरे नाव आहे. स्त्रीची स्वप्ने आकाशाइतकीच उंच असू शकतात. फक्त संधी मिळण्याचा अवकाश असतो. आजही समाजातील अनेक महिलांचे वास्तव कठीण आहे. ग्रामीण भागात शिक्षणाचा अभाव, आर्थिक मर्यादा आणि सामाजिक बंधने यामुळे अनेक महिलांना आपली स्वप्ने पूर्ण करता येत नाहीत. स्त्रीचा सन्मान एका दिवसापुरता मर्यादित नसावा. तो प्रत्येक क्षणी वागण्यात आणि विचारात दिसला पाहिजे. खऱ्या अर्थाने सामाजिक प्रगती साधायची असेल, तर स्त्री-पुरुष समानतेचा विचार कृतीरूप होणे आवश्यक आहे. स्त्री केवळ घराची जबाबदारी सांभाळणारी नाही, तर ती स्वप्न पाहणारी, संघर्ष करणारी आणि समाज घडवणारी शक्ती आहे. तिच्या परिश्रमांचा, जिद्दीचा, त्यागाचा, स्वप्नांचा सन्मान करण्याची प्रेरणा जागवणे, ही महिला दिनामागची खरी भावना आहे. ते जागरण घडावे, या शुभेच्छा.
लेखक-भारत शाह


