एमआयटी डब्ल्यूपीयूच्या क्रीडा विभागाच्या द्रोणाचार्य स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स चे उद्घाटन
पुणे, दि.७ मार्च : ” २०३० मध्ये होऊ घातलेल्या सीडब्ल्यूजी व ऑलिंपिक मध्ये युवा देशातील खेळाडूंनी सर्वच क्रीडा क्षेत्रात आपली चमक दाखवून भारत नंबर १ वर आणण्याचा संकल्प घ्यावा. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांंनी सुरू केलेल्या ‘सांसद खेल महोत्सावा’ मुळे देश नक्कीच ऑलिंपिकमध्ये चमक दाखवेल. देश बदलत असतांना विकसीत भारतासाठी कोणत्याही क्षेत्रात सर्वोत्कृष्ट कार्य करा.” असा विश्वास केंद्रीय रक्षा राज्य मंत्री संजय सेठ यांनी व्यक्त केले. आर्थिक दुर्बल विद्यार्थ्याला पुस्तक मिळावी यासाठी सर्वत्र बूक बँक सुरू करण्याचा सल्ला त्यांनी दिला.
एमआईटी वर्ल्ड पीस यूनिवर्सिटीच्या वतीने क्रीडा विभागासाठी सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेल्या व नव्याने उभारण्यात आलेल्या द्रोणाचार्य स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स चे उद्घाटन केंद्रीय रक्षा राज्य मंत्री संजय सेठ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड हे होते.
यावेळी आंतरराष्ट्रीय एयर रायफल शूटर अंजली भागवत व ग्रॅडमास्टर अभिजित कुंटे हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते.
तसेच एमआयटी डब्ल्यूपीयूचे सीएओ डॉ. प्रसाद खांडेकर, कुलसचिव प्रा. गणेश पोकळे, क्रीडा विभागाचे संचालक डॉ. अभय वाघ, प्रा. विलास कथुरे व प्रा.अभिजित कचरे उपस्थित होते.
संजय सेठ म्हणाले,” द्रोणाचार्य स्पोर्टस कॉम्प्लेक्स मधून खेळाची भावना वाढवून खेळाडूंना सकारात्मक प्रेरणा दिली जाते तेव्हा नक्कीच हा देश कॉमनवेल्थ गेम्स आणि ऑलम्पिकमध्ये सर्वोच्च स्थानवर असेल. खेळाडूंमध्ये उर्जा, सकारात्मक प्रेरणा, समर्पण आणि काम प्रति अनुशासन असावी. देशात खेलो इंडियाच्या माध्यमातून प्रेरणा मिळत आहे. तसेच यासाठी अर्थमंत्री सितारमण यांनी बजेट मध्ये तरतूद केली आहे. त्याच प्रमाणे विद्यार्थ्यांना शिस्त लागावी यासाठी देशात सर्वच विद्यार्थ्यांना एनसीसी लागू करु यासाठी कार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.”
डॉ. राहुल विश्वनाथ कराड म्हणाले,” राजकारण, शिक्षण, धर्म, मीडिया, स्पोर्टस या गोष्टी समाजासाठी अत्यंत महत्वाचे आहे. परंतू खेळ आणि खेळाच्या भावनेतून मुलांच्या व्यक्तिमत्वात महत्वाचा बदल घडून येतो आणि यातूनच सशक्त समाज निर्माण होऊ शकतो. या विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या मनात क्रीडा संस्कृती रुजविण्यासाठी महत्वपूर्ण कार्य केले आहे.”
डॉ.प्रसाद खांडेकर म्हणाले,” एमआयटीच्या विद्यार्थ्यांना शिस्त व खेळाच्या माध्यमातून प्रगतीच्या करण्याच्या उद्देशाने हे विद्यापीठ कार्य करीत आहेत. येथील स्पोर्ट कॉम्प्लेक्स मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा साहित्य उपलब्ध करण्यात आले आहे.”
या प्रसंगी आंतरराष्ट्रीय स्केटिंग खेळाडू श्रेयशी जोशी, आंतरराष्ट्रीय व्हाॅलिबॉल खेळाडू अनया भावसार, आंतरराष्ट्रीय स्केटिंग खेळाडू जिनेश नानल आणि आंतरराष्ट्रीय शूटिंग खेळाडू यशाया कॉन्ट्रॅक्टर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांनी जिम्नॅस्टिक, जापनिज मार्शल आर्टस आणि मल्लखांब वरील प्रात्यक्षिक दाखविले.
सूत्रसंचालन प्रा.डॉ. गौतम बापट यांनी केले. आभार प्रा. डॉ. अभय वाघ यांनी केले.

