पुणे-इथे घराची सरासरी किंमत देखील तब्बल 78 लाख असल्याचे सांगून देशातील सर्वात परवडणारे शहर असा लौकिक असल्याचा ढोल पिटविला जात असताना ,अवघ्या साडेनऊ हजाराच्या मानधनावर 12/ 12 तास काम करून देखील सुमारे 2 हजार महिलांना याच सर्वात परवडणाऱ्या, राहण्यायोग्य असा ढोल पिटविला गेलेल्या शहरात 5/5 महीने पगार मिळालेला नाही, महापालिकेतील सुरक्षा रक्षक असो,आरोग्य खात्यातील सेविका असो वा शहरातील 15 ते 35 हजारावर काम करणाऱ्या लाखों युवकांच्या नागरिकांच्या मग ते कोणत्याही क्षेत्रात काम करणारे असो त्यांच्यासाठी इथे घर घेणे एक महादिव्य ठरतं आहे. आर्थिक विषमतेच्या वेगवान हल्ल्याने पेन्शनरांचे ,शांत पुणे आता गर्भश्रीमंतांच्या जबड्यात जणू अडकल्याचे यावरून स्पष्ट होते आहे.
महापालिकेत राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत काम करणाऱ्या सुमारे दोन हजार आशासेविकांना गेल्या पाच महिन्यांपासून मानधन मिळालेले नसल्याने त्यांना संसार कसा चालवावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेकडून दररोज १२ तास काम करून घेतले जात आहे, शासनाच्या आरोग्याचे उपक्रम राबविले आहेत. पण मानधन मिळत नसल्याने आशासेविका हवालदिल झाल्या आहेत. शासनाकडून निधी न आल्याने आम्ही मानधन देऊ शकणार नाही, असे महापालिकेने म्हटले आहे.
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान राबविण्यासाठी आणि शहरातील आरोग्य व्यवस्थेमध्ये आशासेविकांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. घराघरात जाऊन नागरिकांच्या आरोग्याची माहिती घेणे, गर्भवती महिलांची नोंदणी करणे, लसीकरणासाठी जनजागृती करणे, नवजात बालक आणि मातांची काळजी घेणे तसेच विविध साथीच्या आजारांबाबत माहिती देणे, अशा अनेक जबाबदारी आशा सेविका पार पाडतात. कोरोना, स्वाइन फ्लू यांसारख्या साथीच्या काळातही या सेविकांनी मोठ्या प्रमाणावर काम केले होते.
एवढे महत्त्वाचे काम करूनही गेल्या पाच महिन्यांपासून मानधन मिळाले नसल्याने सेविकांमध्ये तीव्र नाराजी आहे.महापालिका प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप ठोस तोडगा निघालेला नाही.राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानासाठी राज्य सरकारकडून महापालिकेला निधी प्राप्त होतो. पण हा निधी न मिळाल्याने मानधन देता आलेले नाही.आम्ही पाठपुरावा करत आहोत असे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.मानधनाअभावी अल्प उत्पन्न गटातील आशासेविकांना आर्थिक टंचाईला सामोरे जावे लागत आहे.
आशासेविका सकाळी सात ते सायंकाळी सात असे जवळपास १२ तास काम करतात. त्यांना दररोज किमान ५० घरांना भेटी देणे आवश्यक असते. या कामासाठी त्यांना प्रति महिना सुमारे नऊ हजार ५०० रुपये इतके मानधन मिळते. कामाच्या तुलनेत हे मानधन अपुरे असताना त्यात वाढ करावी, अशी मागणी आशा सेविकांची आहे. ही मागणी मान्य करण्याचे तर सोडाच पण केलेल्या कामाचाही मोबदला मिळण्यास पाच महिने थांबावे लागत आहे.
महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त ज्या एक महिलाच आहेत त्या पवनीत कौर यांनी असे म्हटले आहे की,’आशासेविकांचे मानधन महापालिका देत नाही, तर राज्य शासनाकडून दिले जाते. पण महापालिकेला ही रक्कम अजून मिळालेली नाही. ही रक्कम लवकरात लवकर मिळावी, यासाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे. रक्कम मिळताच मानधन दिले जाईल.

