महावितरण मध्ये ‘लाईनमन दिवस’ उत्साहात साजरा
पुणे, दि. ५ मार्च, २०२६: विजेची कामे करताना झालेली एक चूक त्या लाईनमनच्या तीन पिढ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करते. त्याच्यासह अवलंबून असलेले वृद्ध आईवडील व मुलांचे भविष्य अंधकारमय बनते. त्यामुळे वीज कर्मचाऱ्यांनी विजेची कामे करताना सुरक्षा साधनांचा वापर करत चुका टाळल्या पाहिजेत असे प्रतिपादन महावितरणचे संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांनी केले.
बुधवारी (दि. ४ मार्च) ४ थ्या राष्ट्रीय लाईनमन दिनानिमित्त खेड शिवापूर येथील नक्षत्र पॅलेस मध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनिल काकडे, पुणे ग्रामीण मंडलाचे अधीक्षक अभियंता युवराज जरग, कार्यकारी अभियंता देविदास बैकर, धनंजय आहेर, संदीप शेंडगे, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी भूपेंद्र वाघमारे, उपकार्यकारी अभियंता डॉ. संतोष पाटणी यांची प्रमुख उपस्थिती होती. लाईनमन दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबिर, तणावमुक्त जीवन व आरोग्य विषयक काळजी कशी घ्यावी याबाबत वीज कर्मचाऱ्यांना माहिती देण्यात आली.
पुढे बोलताना संचालक श्री. पवार म्हणाले, ‘पुढील काळ स्पर्धेचा आहे. त्यामुळे आपण आपल्या सेवेत सुधारणा करुन शंभर टक्के वीजबिल वसुलीचे ध्येय प्रत्येकाने गाठावे. वीज कर्मचाऱ्यांना लागणारी सर्व अत्याधुनिक सुरक्षा साधने लवकरच मिळणार आहेत. त्याचा कटाक्षाने वापर करावा आणि आपली कामे सुरक्षितपणे पार पाडावीत. कारण जीव पैशाने विकत घेता येत नाही.’
पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनिल काकडे म्हणाले की, ‘ग्राहकांना वीज सेवा देणारा महावितरणचा प्रतिनिधी हा लाईनमनच असतो. तो ग्राहकांशी कसा वागतो त्यावरुन त्या भागात महावितरणची प्रतिमा बनत असते. त्यामुळे ग्राहकांशी चांगले वागा, त्यांच्या समस्या वेळेत सोडवा. यावेळी अधीक्षक अभियंता युवराज जरग व कार्यकारी अभियंता देविदास बैकर यांनीही कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.
उपस्थित लाईनमन यांच्यापैकी सूर्यकांत शिंदे, अमोल शेलार, रुपेश कांबळे, महिला विद्युत सहाय्यक निषाद शेख आदींनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी मुळशी विभागातील सर्व लाईनमन व लाईन वूमन यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सूत्रसंचालन सहा. अभियंता रसिका कुलकर्णी, प्रास्ताविक अतिरिक्त कार्यकारी अभियंता स्नेहलता हंचाटे यांनी केले तर आभार शाखा अभियंता विनायक शिंदे यांनी मानले.
प्रत्येक सोमवारी सुरक्षेची प्रतिज्ञा
वीज कर्मचाऱ्यांना विद्युत सुरक्षेची सवय लागावी. दैनंदिन कामे करताना त्याचे स्मरण व्हावे यासाठी महावितरणने वीज कर्मचाऱ्यांना प्रत्येक आठवड्याची सुरुवात सामुहिक विद्युत सुरक्षेची प्रतिज्ञा घेऊन करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच याची खातरजमा करण्यासाठी प्रत्येक शाखा अभियंत्याने प्रतिज्ञा घेतल्याचे छायाचित्र महावितरणच्या पोर्टलवर अपलोड करायचे आहे. लाईनमन दिनाची सुरुवातही सुरक्षा प्रतिज्ञेनेच झाली. तर मुळशी विभागांतर्गत २६ शाखा कार्यालयांना महावितरणचे संचालक (मासं) श्री. राजेंद्र पवार यांच्या हस्ते आवश्यक सुरक्षा साधनांचे प्रातिनिधीक वाटप करुन समारोप करण्यात आला.
५ आयएसओ मानांकन
पुणे ग्रामीण मंडलांतर्गत अनुक्रमे पुणे ग्रामीण मंडल, मुळशी विभाग, हडपसर ग्रामीण उपविभाग, येणेरे ३३/११ केव्ही उपकेंद्र व २२/२२ केव्ही कोलते पाटील स्विचिंग स्टेशनला आयएसओ मानांकन मिळाले त्याचे वितरणही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

