मुंबई– भांडुप परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण भाग हादरला आहे. आठवीत शिकणाऱ्या अवघ्या 14 वर्षीय मुलाचा त्याच्याच मित्रांकडून मारहाणीत मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह तलावात टाकून बुडाल्याचा बनाव करण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले. या प्रकरणी भांडुप पोलिसांनी 14 ते 15 वयोगटातील तिघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
मृत मुलाचे नाव सिद्धार्थ अजय लोंढे (वय 14) असे असून तो भांडुप पश्चिमेकडील तुळशेटपाडा परिसरात कुटुंबासह राहत होता. 22 फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे तीन वाजता तो खेळायला जात असल्याचे सांगून घराबाहेर पडला. मात्र रात्री उशिरापर्यंत तो परत न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. काहीच माहिती न मिळाल्याने आईने पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. अल्पवयीन मुलगा गायब झाल्यामुळे पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
चौकशीदरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ मित्रांवर वारंवार दादागिरी करत असल्याची भावना काही मुलांमध्ये होती. त्यातूनच त्याला धडा शिकवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याला विहार तलाव परिसरात नेण्यात आले आणि तेथे त्याला मारहाण करण्यात आली. या मारहाणीत त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. जखम गंभीर असल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे.
घटनेनंतर घाबरलेल्या मुलांनी काय करावे हे न समजल्याने मृतदेह तलावात टाकून तो पाण्यात बुडाल्याचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी सायंकाळी सुमारे पाच वाजता विहार तलावात एक मृतदेह तरंगताना आढळला. याची माहिती मिळताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून पुढील तपासासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आला.
शवविच्छेदन अहवालात डोक्यावर गंभीर जखमा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांचा संशय बळावला. त्यानंतर मित्रांची कसून चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान एका मुलाने गुन्ह्याची कबुली दिली आणि आणखी दोन जण सहभागी असल्याचे सांगितले. पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतले असून मारहाणीत वापरलेली लाकडी काठी जप्त केली आहे. पुढील कारवाईसाठी तिन्ही मुलांना डोंगरी येथील बाल निरीक्षण गृहात ठेवण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एवढ्या लहान वयातील मुलांनी अशा प्रकारे मित्राचा जीव घेतल्याची बाब धक्कादायक मानली जात आहे. दादागिरीच्या रागातून सुरू झालेला वाद इतका टोकाला जाईल, याची कुणालाही कल्पना नव्हती. पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून समाजात वाढत चाललेल्या बालगुन्हेगारीबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे.

