“शब्दांमधून विचार, विचारांमधून कृती आणि कृतीतून चारित्र्य घडते; युवकांनी सवयी जाणीवपूर्वक घडवाव्यात- विश्वास नांगरे पाटील”
नाशिक, दि. ०१ मार्च २०२६ : नाशिक येथे आयोजित चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनात “मराठी भाषेतील युवा वर्गाचा सहभाग” या विषयावर विशेष व्याख्यान सत्र पार पडले. या सत्रात विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि अतिरिक्त पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांनी युवा वर्गाला मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास अॅड. नितीन ठाकरे, शामकांत देवरे (संचालक, राज्य मराठी विकास संस्था), नामदेव भोसले (सहसचिव, मराठी भाषा विभाग), संवादक अभिजीत ब्रह्मनाथकर आणि सूत्रसंचालक कीर्ती पेंढारकर यांची उपस्थिती होती. यावेळी डॉ. गोऱ्हे यांचा सत्कार किरण कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला
युवा पिढी बिघडलेली नाही; संवादाची परिभाषा बदलली – डॉ. गोऱ्हे
विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले की, आजची युवा पिढी बिघडलेली नाही, तर बाह्य संदर्भ आणि तंत्रज्ञानाच्या प्रभावामुळे तिच्या संवादाची भाषा व पद्धती बदलली आहे. भाषा दर दहा वर्षांनी बदलते, त्यामुळे शुद्धतेचा अति आग्रह धरण्याऐवजी भावार्थ समजून घेणे महत्त्वाचे आहे. मोबाईल हे वरदान असले तरी त्याचा अतिरेक दुष्परिणाम घडवू शकतो. कोणती माहिती स्वीकारायची आणि कोणती नाकारायची याचा निर्णय युवकांनी स्वतः घ्यायला हवा. “मिसळ चालेल, पण भेसळ नको,” असे म्हणत त्यांनी सांस्कृतिक मूल्यांची जपणूक करण्याचे आवाहन केले.
एकत्रित कुटुंब पद्धती लुप्त होत चालल्याने पालक आणि मुलांमधील संवाद कमी होत आहे. मुलांवर अभ्यासाबरोबरच विविध क्लासेसचा वाढता ताण, घरांमधील लोकशाहीचा अभाव आणि निर्णयस्वातंत्र्याची कमतरता या बाबी चिंताजनक असल्याचे त्यांनी नमूद केले. मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे घरातील वातावरण बदलले असून, पालकांनी मुलांना ‘नाही’ म्हणण्याची सवय लावली पाहिजे. अति लाड आणि अवास्तव अपेक्षा यामुळे मुलांमध्ये नैराश्य वाढू शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.
भाषेच्या प्रदूषणाचा प्रश्न उपस्थित करताना त्यांनी सांगितले की, संस्कार हे केवळ वेशभूषा किंवा खाद्यसंस्कृतीपुरते मर्यादित नसून माणसाशी माणूस कसा वागतो यात त्यांचा गाभा आहे. मुलांना जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य, घरातील संवाद आणि सामाजिक समता या मूल्यांची जपणूक करणे गरजेचे आहे.
सभागृहातील कामकाजाविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की विरोधी पक्ष आपली जबाबदारी पार पाडत असतो; मात्र असंसदीय शब्दप्रयोग झाल्यास कारवाई करावी लागते. लोकहिताच्या विषयांना पुरेशी प्रसिद्धी मिळावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
राजकारणात आशीर्वाद आणि आश्वासन या दोन्हींचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी सांगितले, लोकांशी सातत्याने संपर्क ठेवणे आवश्यक आहे. शाश्वत विकासाच्या तत्त्वानुसार “मागे वळून पहा आणि सर्वांना बरोबर घेऊन चला” हा दृष्टिकोन स्वीकारावा, असे आवाहन त्यांनी युवकांना केले.
‘जनरेशन Z’ क्रिएटिव्ह आणि इनोव्हेटिव्ह; दोष देण्याऐवजी समजून घ्या – विश्वास नांगरे पाटील
अतिरिक्त पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांनी ‘जनरेशन Z’ ला दोष देण्यात अर्थ नसल्याचे स्पष्ट केले. आजची पिढी टेक्नोसॅव्ही, क्रिएटिव्ह आणि इनोव्हेटिव्ह आहे. समाजातील बदल आणि ‘दार बंद संस्कृती’मुळे काही प्रवृत्ती निर्माण झाल्या असल्या तरी मुलांचे गुण-दोष हे समाजाचेच प्रतिबिंब असतात, असे त्यांनी सांगितले.
प्रशासनात पूर्वी इंग्रजीचे वर्चस्व होते; मात्र आता मराठीतील कामकाज वाढत आहे. तरीही काही मराठी शब्द न समजल्यास इंग्रजीचा आधार घ्यावा लागतो, असे त्यांनी स्पष्ट केले. पोलीस दलाचा संदेश हा केवळ बंदुकीचा नसून संकेत, शिस्त आणि मूल्यांचा असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
स्त्री-पुरुष समानतेविषयी बोलताना त्यांनी डॉ. गोऱ्हे लिखित ‘स्त्री-पुरुष समानता’ हे पुस्तक आपल्या जवळ ठेवत असल्याचा उल्लेख केला. युवकांनी शरीर आणि मन दोन्ही बळकट ठेवण्यावर भर द्यावा. शब्दांमधून विचार घडतात, विचारांतून कृती आणि कृतीतून चारित्र्य तयार होते, त्यामुळे चांगल्या सवयी अंगीकारणे अत्यावश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले.
परिसंवादात युवा पिढीची बौद्धिक आणि श्रमशक्ती ही भारताची ताकद असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. प्रभाव दाखवण्यापेक्षा माणूस म्हणून घडणे अधिक महत्त्वाचे आहे, असा संदेश देत मराठी भाषा आणि संस्कृती जागतिक स्तरावर समर्थपणे पुढे नेण्याचे आवाहन या सत्रातून करण्यात आले.

