रमजानच्या पवित्र महिन्यात ‘उमरा’ या धार्मिक विधीसाठी सौदी अरेबियात गेलेल्या महाराष्ट्रातील सुमारे ५० हजार ते १ लाख मुस्लिम बांधवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आखाती देशांमधील बिघडलेली युद्धजन्य परिस्थिती पाहता, हे भाविक तेथे अडकल्याची दाट शक्यता राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर आयोगाने तातडीने हालचाली सुरू केल्या असून, सर्व यात्रेकरूंना सुरक्षित परत आणण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
हज यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांची सरकारकडे अधिकृत नोंद असते, मात्र उमरासाठी अशी कोणतीही केंद्रीकृत व्यवस्था नाही. बहुतांश यात्रेकरू खासगी टूर अँड ट्रॅव्हल्स ऑपरेटर्समार्फत प्रवास करतात. “राज्यातील सुमारे ५०० हून अधिक ऑपरेटर्सनी यंदा यात्रेकरूंना पाठवले असून, त्यापैकी केवळ मुंबईतूनच १०० हून अधिक ऑपरेटर्स सक्रिय आहेत. त्यामुळे अडकलेल्या भाविकांचा नेमका आकडा सोमवारपर्यंत स्पष्ट होईल,” असे प्यारे खान यांनी सांगितले.
उमरासाठी गेलेल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबांतील भाविकांचा समावेश आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे विमानांची उड्डाणे रद्द झाल्यास किंवा मुक्काम लांबल्यास या यात्रेकरूंना मोठ्या आर्थिक टंचाईला सामोरे जावे लागू शकते. ही बाब लक्षात घेऊन भारतीय दूतावासाशी समन्वय साधला जात असून, भाविकांना तिथे कोणतीही अडचण येऊ नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत.राज्य अल्पसंख्यांक आयोग या संपूर्ण प्रकरणावर बारीक लक्ष ठेवून आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून केंद्र सरकारमार्फत विशेष मदत मिळवण्याची विनंती केली जाणार आहे, असेही प्यारे खान यांनी सांगितले. राज्यातील प्रत्येक जिल्हा आणि गावातून भाविक उमरासाठी जात असल्याने, ही घटना राज्यभरातील हजारो कुटुंबांच्या काळजाचा ठोका चुकवणारी ठरत आहे.
रमजान काळात उमरा या धार्मिक विधीसाठी महाराष्ट्रातून सौदी अरेबियात गेलेले 50 हजार ते 1 लाख मुस्लिम बांधव अडकले असल्याची भीती राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी व्यक्त केली. राज्य अल्पसंख्यांक आयोगाने यासंदर्भात तातडीने हालचाली सुरू करत सर्वांना सुरक्षित परत आणण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. यंदा राज्यातील सुमारे 500 टूर ऑपरेटर्सनी उमरा या धार्मिक विधीसाठी यात्रेकरूंना पाठवले असून, त्यापैकी केवळ मुंबईतूनच 100 हून अधिक ऑपरेटर्स सक्रिय होते, अशी माहिती समोर आली आहे.

