सुनेत्रांना उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय आमचा नव्हे राष्ट्रवादीचा होता
विलिनीकरणाच्या सीक्रेटची मला माहिती नाही
पतंगबाजी किंवा हवेत गोळीबार नको
मुंबई-अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या मृत्यूवर कुणीही पतंगबाजी करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. अशा घटना घडतात तेव्हा आपण कोणतीही पतंगबाजी किंवा हवेत गोळीबार करण्याचा प्रयत्न करू नये. हा अत्यंत संवेदनशील मुद्दा असतो. या प्रकरणी आपण मृत व्यक्तीच्या पद व प्रतिष्ठेचा तथा त्याच्या कुटुंबीयांच्या प्रतिष्ठेचाही विचार करायला हवा, असे ते म्हणालेत.
अजित पवार यांचे गत 28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या एका विमान अपघातात निधन झाले. तेव्हापासून सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस व विरोधी बाकावरील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आमदार हा अपघात नसून, घातपात असल्याचा आरोप करत आहेत. विशेषतः शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या दुर्घटनेविषयी काही महत्त्वपूर्ण खुलासे व पुरावे सादर करून या प्रकरणात घातपाताचा संशय असल्याचा ठाम दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना उपरोक्त आवाहन केले आहे.
मुख्यमंत्री म्हणाले, आमदार रोहित पवार यांनी माझी भेट घेऊन काही मुद्दे मांडले. त्यांनी दिलेल्या पत्राला मी माझे पत्र जोडून डीजीसीएकडे या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी करणार आहे. पण अशा घटना घडतात तेव्हा आपण कोणतीही पतंगबाजी करू नये. कारण, हा अत्यंत संवेदनशील मुद्दा असतो. दुर्दैवाने जी व्यक्ती मृत आहे, त्या व्यक्तीच्या पद व प्रतिषेठाचा आपण विचार केला पाहिजे. विशेषतः त्याच्या कुटुंबीयांच्या प्रतिष्ठेचाही या प्रकरणी विचार झाला पाहिजे. त्यामुळे या प्रकरणी कोणतीही पतंगबाजी किंवा हवेत गोळीबार करू नये असे मला वाटते. या प्रश्नावर याहून अधिक मी बोलू इच्छित नाही.
मुख्यमंत्र्यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण तथा सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीसाठी करण्यात आलेल्या कथित घाईच्या मुद्यावरही भाष्य केले. तसेच सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय हा आमचा नव्हे तर राष्ट्रवादीचा होता असेही स्पष्ट केले. ते म्हणाले, सुनेत्रा पवार यांच्याविषयी घेण्यात आलेल्या निर्णयात आमच्या पक्षाचा कोणताही सहभाग नव्हता. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सुनेत्रा पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी त्याची माहिती आम्हाला दिली. ते कागदपत्रांसह माझ्याकडे आले. त्यांनी एक तारीख दिली. त्यावर माझा कोणताही आक्षेप नव्हता. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विनंती केली आणि आम्ही ती मान्य केली. तो निर्णय त्यांच्या पक्षाचा होता. आमचा नव्हता.
विलिनीकरणाच्या मुद्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या एका बैठकीचा व्हिडिओ समोर आला. त्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी स्पष्टीकरण दिले. अजित पवार व शरद पवार यांच्यात विलिनीकरणाची काही चर्चा सुरू होती, तर त्याचा आमच्याशी कोणताही संबंध नव्हता. पण असा एखादा निर्णय झाला असता तर अजित पवारांना मित्रपक्ष म्हणून आमचा सल्ला घ्यावा लागला असता. परंतु अजितदादांनी याविषयी आमच्यासोबत कोणतीही चर्चा केली नव्हती. याी प्रकरणी काही सीक्रेट असेल तर त्याची मला माहिती नाही, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

