पत्रकार साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांची मागणी
नागपूर.. महाराष्ट्र शासनाच्या मराठी विश्वकोश मंडळाने प्रकाशित केलेल्या मराठी विश्वकोशात १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धाचा उल्लेख उठाव असा केलेला असून यात स्वातंत्र्य योद्धे म्हणून गौरवले गेलेले नानासाहेब पेशवे, तात्या टोपे, झाशीची राणी लक्ष्मीबाई प्रभृतींचा एकेरीत उल्लेख करण्यात आला आहे. या मुद्द्याकडे लक्ष वेधत या अवमान जनक नोंदी विश्वकोशाच्या पुढील खंडांमध्ये तसेच संकेतस्थळावर दुरुस्त केल्या जाव्या अशी मागणी करणारी याचिका राज्य विधिमंडळाच्या पिठासीन अधिकाऱ्यांकडे पत्रकारिता, साहित्य, सांस्कृतिक, आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत काही व्यक्तींनी दाखल केली आहे.
नागपुरातील ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांच्या पुढाकाराने विधानसभा अध्यक्ष एड. राहुल नार्वेकर आणि विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्याकडे दाखल करण्यात आलेल्या या याचिकेवर अविनाश पाठक, विनोद देशमुख, श्रुती देशपांडे, महेश आंबोकर, विजय आडे, चारुदत्त कहू, उदय अंधारे, संजय लोखंडे, दीपक देशपांडे, कार्तिक लोखंडे, अरविंद मराठे, मेजर जनरल अच्युत देव, सुरेश विंचुरकर, सुनील किटकरु, नितीन केळकर, एड. लखनसिंह कटरे, आणि शशिकांत सुरंगळीकर प्रभूतींनी सह्या केल्या असून या संदर्भात निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे.
मराठी विश्वकोशाच्या खंड एक आणि खंड अठरा मध्ये अठराशे सत्तावनचा उठाव असल्याचा उल्लेख केला असून काही लोक याला बंड म्हणतात, तर काहींनी स्वातंत्र्ययुद्ध म्हणून उल्लेख केला आहे, असे नमूद केले असल्याचे या पत्रात म्हटले आहे. १८५७ चे स्वातंत्र्य युद्धच होते, याबाबत स्वातंत्र्यवीर सावरकरांनी १८५७ चे स्वातंत्र्यसमर या विषयावर ग्रंथलेखन देखील केले आहे याकडे या पत्रात लक्ष वेधण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे झाशीची राणी लक्ष्मीबाई, नानासाहेब पेशवे, तात्या टोपे या स्वातंत्र्य योद्ध्यांचा एकेरीत उल्लेख विश्वकोशाच्या खंडांमध्ये केला असून तो अवमानजनक असल्याचेही या याचिकेत म्हटले आहे. झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांनी स्वातंत्र्यरक्षणासाठी तटावरून घोडा फेकून देशासाठी आहुती दिली, तर तात्या टोपे हे फासावर चढले. त्यांच्या बलिदानावरच वसंत वरखेडकरांची सत्तावनचा सेनानी ही कादंबरी देखील प्रसिद्ध आहे, हे देखील याचिकेत नमूद केले आहे, आणि या महानीय योद्ध्यांचा सन्मानपूर्वक उल्लेख विश्वकोशात केला जावा अशी मागणी केली आहे.
याचिकाकर्त्यांनी विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापतींकडे ही पत्रे पाठवली असून त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार तसेच मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनाही या संदर्भात पत्रे पाठवली आहेत. सर्व पत्रांसोबत विश्वकोशातील संबंधित पृष्ठांच्या झेरॉक्स कॉपीजही जोडलेल्या आहेत.

