पुणे : गरीब, सामान्य नागरीकांसाठी असलेले रेशन वरील धान्य बायोमेट्रीक पद्धतीचा गैरवापर करून उचलले जात आहे. हा डिजीटल दरोड्याचा प्रकार आहे. अशा रेशन माफियांवर कडक कारवाई करून जरब बसवावी, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज गुरुवारी विधान सभेत बोलताना केली .
ज्या शिधा पत्रिका धारकांनी काही महिने धान्य घेतलेले नसते. अशा शिधा पत्रिका धारकांचे धान्य बायोमेट्रीक गैरवापर करून ऑनलाईन पद्धतीने उचलले जाते. पुण्यातील कर्वेनगर भागातील नागरिकांना त्यांनी रेशनवर धान्य घेतले नसतानाही ‘ धान्य उचलले ‘ असे मेसेज येत आहेत. हा प्रकार केवळ तांत्रिक बाब नसून डिजीटल दरोडा आहे. असा अंदाज आहे की, पुण्यातील साधारण १० टक्के म्हणजे ३ हजार ५०० शिधापत्रिका धारकांचे धान्य गायब केले जाते , असे आमदार शिरोळे यांनी सांगितले.
या प्रकारात ६ हजार टन धान्य काळ्या बाजारात विकून १ कोटी २० लाख रुपयांच्या धान्याची लूट केली जाते, असा गंभीर प्रकार आमदार शिरोळे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिला.

