देशातील अगदी तळागाळातील माणसापर्यंत एआय साधने पोहोचणे आवश्यक: टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन

Date:

लवकरच एआय बहुतेक सर्व क्षेत्रांमध्ये मानवी क्षमतेला मागे टाकून पुढे जाईल : एंथ्रोपिक चे मुख्य कार्यकारी अधिकारी दारिओ आमोदेई यांचा इशारा

नवी दिल्ली, 19 फेब्रुवारी 2026

भारत मंडपममध्ये झालेल्या इंडिया इम्पॅक्ट एआय शिखर परिषद 2026 च्या उच्चस्तरीय उद्घाटन सोहळ्यात जगभरातील आघाडीचे नेते व उच्च तंत्रज्ञान क्षेत्रातील नामवंत कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी एकत्रित उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडला. जबाबदारीच्या भावनेतून नवोपक्रम, वैज्ञानिक प्रगति व कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयचे भवितव्य आकारण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याची आवश्यकता यावर शिखर परिषदेचा भर राहील असे या सोहळ्यातून स्पष्ट झाले. 

लोकशाहीकरण, व्याप्ती व सार्वभौमत्व यावर भारताचे एआय धोरण आधारित असल्याचे केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केले. उपयोजन, प्रारूपे, गणना, प्रतिभा आणि ऊर्जा (अप्लिकेशन्स , मॉडेल्स, कंप्यूट, टॅलेंट, एनर्जी) या एआय क्षेत्रातील पाच स्तरांबद्दल भारताचा सर्वसमावेशक दृष्टिकोन असून आरोग्यसेवा, कृषी, शिक्षण व सार्वजनिक सेवा क्षेत्रातील एआयच्या वास्तविक वापरावर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी भावीकाळातील पायाभूत सुविधा अर्थात बुद्धिमत्तेचा पाया अशा शब्दात एआयचे वर्णन केले. परिवर्तन घडवण्याची एआयची क्षमता पूर्वीच्या काळात वाफेचे इंजिन, वीज आणि इंटरनेटने घडवलेल्या क्रांतीसारखी असल्याचे त्यांनी सांगितले. भारताच्या डिजिटल पायाभूत सुविधा विकासात झालेल्या प्रगतीवर त्यांनी भाष्य केले. चिप्स व संबंधित यंत्रणेपासून ऊर्जा व उपयोजनापर्यंत धोरणात्मक राष्ट्रीय क्षमतेतील सुधारणा एआयमुळे  विकसित होणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. 

एआय क्षेत्रातील अपार संधींबद्दल माहिती देताना ते म्हणाले की, एआय ही भविष्यातील सर्वात महत्वाची पायाभूत सुविधा असेल, ती बुद्धिमत्तेसाठी आवश्यक असणारी पायाभूत सुविधा असेल. देशातील प्रत्येक नागरिकाला एआयचा उपयोग होईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे त्यांनी सांगितले. केवळ देशातील नव्हे तर संपूर्ण जगातील सर्वात तळागाळातील नागरिकाच्या आवाक्यात एआय साधने मिळावीत, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे प्रतिपादन त्यांनी केले. आपण एका महत्वाच्या टप्प्यावर आहोत, आताच्या काळात अपार बुद्धिमत्ता उपलब्ध आहे, पण खरी गरज आहे विश्वास, नेतृत्वगुण व मानवी क्षमतेची, असे ते म्हणाले .

एंथ्रोपिक चे मुख्य कार्यकारी अधिकारी दारिओ आमोदेई यांनी वर्ष 2023 मध्ये  ब्लेचली पार्क इथे झालेल्या पहिल्या एआय सुरक्षितता शिखर परिषदेपासून वेगाने झालेल्या एआय विकासाचा आढावा घेतला व गेल्या अडीच वर्षात हा वेग प्रचंड वाढला असल्याचे अधोरेखित केले. गेल्या दशकात एआय विकासाचा वेग प्रचंड  प्रमाणात वाढत गेला आहे आणि लवकरच सर्व क्षेत्रांमध्ये मानवी क्षमतेला मागे टाकून पुढे जाईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला. 

“गेल्या दहा वर्षांत ए आय विकासाचा वेग प्रचंड प्रमाणात वाढत चालला आहे आणि त्या वाटेवर आपण आता खूप पुढे आलो आहोत. आपण आता ‘डेटा सेंटर मधील अतिबुद्धिमत्तेचे केंद्रीकरण’ म्हणजेच,  लवकरच बहुतेक सर्व लोकांपेक्षा खूप जास्त बुद्धिमान, सक्षम व अतिमानवी वेगाने समन्वय साधणारे ए आय एजंट तयार होतील, या परिस्थितीच्या अगदी जवळ आलो आहोत. या पातळीवरील उच्च क्षमतेमुळे रोगांवरील रामबाण उपाय, गरिबीचे निर्मूलन, आणि अधिक चांगले जग निर्माण करण्याच्या अद्भुत संधी उपलब्ध होतील, परंतु त्यातून काही धोकेही संभवतात. हे सर्व इतके वेगाने होईल की यातून मिळणारी समृद्धी सर्वांना उपभोगता यावी व जबाबदारीने वापरता यावी यासाठी तसेच समाजाची मोडणारी घडी पुन्हा नीट बसविण्यासाठी जगभरातील कंपन्या व सरकारांना एकत्रितपणे प्रयत्न करावे लागतील.” ते म्हणाले. 

आपल्या भाषणात गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेला “आयुष्यातील सर्वात मोठा तंत्रज्ञानात्मक बदल” असे संबोधले आणि वैज्ञानिक शोधांना वेग देण्याच्या त्याच्या क्षमतेवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, “कृत्रिम बुद्धिमत्ता हा आयुष्यातील सर्वात मोठा तंत्रज्ञानात्मक बदल आहे. आपण अतिवेगवान प्रगती आणि नव्या शोधांच्या उंबरठ्यावर उभे आहोत, जे उदयोन्मुख अर्थव्यवस्थांना जुने तांत्रिक अंतर झपाट्याने भरून काढण्यास मदत करू शकतात. परंतु हा परिणाम निश्चित किंवा आपोआप घडणारा नाही. सर्वांसाठी उपयुक्त अशी कृत्रिम बुद्धिमत्ता विकसित करायची असेल, तर आपण धाडसाने पुढे जावे, जबाबदारीने तिचा वापर करावा आणि या निर्णायक क्षणी एकत्रितपणे कार्य करावे. डिजिटल दरी ही कृत्रिम बुद्धिमत्तेची दरी बनू देता कामा नये.”

संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी ग्लोबल साऊथमधील  राष्ट्रांमध्ये पहिल्या कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर परिषदेचे आयोजन केल्याबद्दल भारताच्या नेतृत्वाचे कौतुक  केले. त्यांनी अधोरेखित केले की कृत्रिम बुद्धिमत्तेचे भविष्य काही मोजक्या देशांनी किंवा खाजगी हितसंबंधांनी ठरवता कामा नये. संयुक्त राष्ट्र महासभेने उचललेल्या दोन महत्त्वाच्या पावलांचात्यांनी उल्लेख केला.ते म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेसंदर्भात 40 जागतिक तज्ज्ञांचे  स्वतंत्र आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक पॅनेल स्थापन करणे आणि सर्वसमावेशक, बहु-हितधारक सहभाग सुनिश्चित करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशासनावरील जागतिक संवाद सुरू करणे. मानवी नियंत्रण आणि उत्तरदायित्व जपणाऱ्या मार्गदर्शक तत्त्वांची आवश्यकता व्यक्त करत ते म्हणाले, “कृत्रिम बुद्धिमत्तेचे भविष्य काही मोजक्या देशांनी ठरवू नये किंवा काही अब्जाधीशांच्या इच्छेवर सोडू नये. मानवी स्वायत्तता, मानवी देखरेख आणि मानवी उत्तरदायित्व जपणारी संरक्षक तत्त्वे आवश्यक आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता सर्वांसाठी सुलभ असली पाहिजे. म्हणूनच मी विकसनशील देशांमध्ये मूलभूत क्षमता उभारण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी जागतिक निधी स्थापन करण्याचे आवाहन करीत आहे. खरा परिणाम म्हणजे जीवनमान उंचावणारे आणि पृथ्वीचे संरक्षण करणारे तंत्रज्ञान; त्यामुळे प्रतिष्ठा हे  मूलभूत मूल्य ठेवून आपण सर्वांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता उभारूया.”

बीजभाषण करताना फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी वेगाने वाढणाऱ्या तांत्रिक स्पर्धेच्या युगात सार्वभौम, स्वतंत्र आणि सहयोगात्मक कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान  विकासाचे महत्त्व अधोरेखित केले. भारताच्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या क्रांतीचा संदर्भ देत त्यांनी सध्याच्या कृत्रिम बुद्धिमत्ता परिवर्तनाशी त्याची तुलना केली. त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेला भू-राजकारण, आर्थिक शक्ती आणि जागतिक संतुलन घडविणारे धोरणात्मक क्षेत्र असे संबोधले. भारत आणि युरोप यांनी स्वीकारलेल्या पूरक मार्गांचा उल्लेख करत ते म्हणाले, “सर्वात महागडी कृत्रिम बुद्धिमत्ता सर्वात हुशार असेलच असे नाही. योग्य उद्देशाने आणि उत्कृष्ट तज्ज्ञांनी तयार केलेली प्रणालीच खऱ्या अर्थाने सक्षम ठरते. नवोन्मेष आणि जबाबदारी, तंत्रज्ञान आणि मानवता यांचा समतोल साधणारे देशच कृत्रिम बुद्धिमत्तेचे भविष्य घडवतील. कोणताही देश केवळ परदेशी कंपन्यांनी त्यांची मॉडेल्स विकावीत आणि नागरिकांचा डेटा डाउनलोड करावा, एवढ्यापुरताच बाजार म्हणून राहण्यास मर्यादित नाही. नवोन्मेष, स्वातंत्र्य आणि धोरणात्मक स्वायत्ततेचा मार्ग पुढे आहे आणि भारत व फ्रान्स मिळून हे भविष्य घडवतील.”

शिखर परिषदेच्या उद्घाटन सत्रात जागतिक राजकीय नेते, बहुपक्षीय संस्था आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी व्यक्तींच्या सहभागामुळे परिषदेचे महत्त्व अधोरेखित झाले. परस्परांशी अधिक जोडल्या गेलेल्या आणि वेगाने बदलणाऱ्या जगात कृत्रिम बुद्धिमत्तेचा पुढील प्रवास निश्चित करणारे व्यासपीठ म्हणून या शिखर परिषदेची ओळख अधोरेखित झाली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शिवजयंतीनिमित्त स्वच्छतेचा संकल्प – ‘स्वच्छता पर्व पुरस्कार’चा भव्य शुभारंभ

पुणे: आज १९ फेब्रुवारी, शिवजयंतीच्या पावनदिनी पुणे महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन...

एमआयटी डब्ल्यूपीयूतील २८० वर्गांमध्ये उलगडलाछत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली वारसा

देशात प्रथमच अनोखा प्रयोगः किल्ल्यांचे प्रदर्शन, रक्तदान शिबिर, ग्रंथ...

शिवजयंती निमित्त शिवरायांना सरदारांच्या वंशजांकडून मानवंदना

पुणे : तिरुपती बालाजीची फुलांची आकर्षक सजावट असलेला जिजाऊ...