पुणे महानगरपालिका, यशदा आणि संवादतर्फे आयोजन
पुणे : पुणे महानगरपालिका, यशदा आणि संवाद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दुसरे प्रशासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन शनिवार दि. २१ व रविवार दि. २२ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत पुण्यात आयोजित करण्यात आहे. संमेलन बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित करण्यात आले असून संमेलनाचे यंदाचे दुसरे वर्ष आहे, अशी माहिती यशदाचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड, यशदाचे अतिरिक्त जिल्हाधिकारी राजीव नंदकर, संवाद, पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन यांनी आज (दि. १६) पत्रकार परिषदेत दिली. पुणे महापालिका मराठी भाषा संवर्धन समितीच्या सचिव आशा उबाळे उपस्थित होत्या.
तेलंगणाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक महेश भागवत संमेलनाचे अध्यक्ष असून पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम स्वागताध्यक्ष आहेत. यशदाचे महासंचालक निरंजनकुमार सुधांशू संमेलनाचे मुख्य संयोजक असून विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार सहसंयोजक आहेत.
संमेलनाचे उद्घाटन शनिवार, दि. २१ रोजी सकाळी १०:३० वाजता महापौर मंजुषा नागपुरे आणि उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या उपस्थितीत होणार आहे. संमेलनात शासकीय अधिकाऱ्यांच्या उत्कृष्ट साहित्यकृतीला वाङ्मय पुरस्कार देऊन गौरविले जाणार आहे.
दुपारी १२ वाजता ‘शासकीय अधिकाऱ्यांच्या साहित्य लेखनातील आव्हाने’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला असून यात ९५व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे, केंद्रीय उच्च शिक्षा मंत्रालयातील अतिरिक्त सचिव आनंद पाटील, नवी दिल्लीच्या महाराष्ट्र सदनातील निवासी आयुक्त सुशील गायकवाड यांचा सहभाग असणार आहे.
दुपारी १:३० वाजता महाराष्ट्राबाहेरील महाराष्ट्रीयीन प्रशासकीय अधिकाऱ्यांचे अनुभवकथन ऐकता येणार आहे. यात तेलंगणाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक महेश भागवत, भुवनेश्वरचे महापालिका आयुक्त राजेश पाटील, राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाचे सल्लागार ज्ञानेश्वर मुळे, ओरिसा पशुसंवर्धन विभागाचे संचाकल विजय कुलांगे, बिहार राज्य रस्ते विकास मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक कपिल शिरसाट, एनआयए विभागाचे पोलिस अधीक्षक प्रतीक ठुबे, आयकर आयुक्त सुरेन्द्रकुमार मानकोसकर यांचा सहभाग असणार आहे.
दुपारी ३ वाजता ‘शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाची भूमिका व आव्हाने’ या विषयावर पहिले संमेलनाध्यक्ष, यशदाचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आली असून त्यांच्याशी यशदातील अतिरिक्त जिल्हाधिकारी राजीव नंदकर संवाद साधणार आहेत.
दुपारी ४ वाजता अभिजात मराठी भाषा व प्रशासन या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला असून यात ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, मराठी भाषा विभागाचे संचालक किरण कुलकर्णी, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अहिल्यानगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांचा सहभाग असून त्यांच्याशी किशोर मासिकाचे संपादक किरण केंद्रे संवाद साधणार आहेत.
शासकीय अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी ५:१५ वाजता कविसंमेलन आयोजित करण्यात आले असून यात निवृत्त सनदी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, अतिरिक्त आयुक्त वैशाली पतंगे, अतिरिक्त जिल्हाधिकारी सतीश राऊत, उपसचिव लीना संखे, उपजिल्हाधिकारी गणेश मरकड, अतिरिक्त जिल्हाधिकारी मनिषा कुंभार, उपजिल्हाधिकारी वैशाली राजमाने, पीएमआरडीच्या सहआयुक्त मोनिका सिंग, निवृत्त मुख्याधिकारी विद्या पोळ, यशदातील माध्यम व प्रकाशन विभागातील व्यंकटेश कल्याणकर, यशदातील सहायक प्राध्यापक किरण धांडे यांचा सहभाग असणार आहे.
सायंकाळी ६:१५ वाजता भारत सासणे यांच्या कथेवर आधरित ‘मुर्गा’ हा लघुपट दाखविला जाणार असून पटकथा व संवाद लेखन राजेश जोशी यांचे असून किरण लद्दे दिग्दर्शक आहेत.
रविवार, २२ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता ‘स्पर्धा परीक्षा संधी, समस्या व आव्हाने’ या विषयावर पोलिस सेवेतील प्रशिक्षणार्थी बिरदेव डोणे, महसूल विभागातील सोनल सोनकवडे, उपजिल्हाधिकारी शुभम पाटील, सोनल सूर्यवंशी, प्रसाद चौघुले बोलणार आहेत. अतिरीक्त जिल्हाधिकारी राजीव नंदकर सत्र संचालक आहेत.
सकाळी ११ वाजता ‘माझे वाचन आणि लेखन’ या विषयावर अपर मुख्य सचिव विकास खारगे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हार्डीकर, निवृत सनदी अधिकारी सुनील पाटील, उप महासंचालक पौर्णिमा गायकवाड, साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार विजेते व तहसीलदार आबा महाजन, राज्य कर उपायुक्त अंजली ढमाळ बोलणार आहेत.
दुपारी १२ वाजता ‘प्रशासकीय अधिकारी व साहित्य निर्मिती’ या विषयावरील परिसंवादात विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, सीजीएसटीच्या अतिरिक्त आयुक्त वैशाली पतंगे, बालभारतीच्या संचालक अनुराधा ओक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोनाली इरपळे-घुले, राज्य कर उपआयुक्त अंजली ढमाळ यांचा सहभाग असणार आहे.
दैनंदिन प्रशासकीय कामकाजात घडणाऱ्या विनोदाबाबत यशदाचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड, निवृत्त कृषी उपसंचालक नाथ राणे, सत्यशील गुर्जर, निवृत्त पोलिस अधिकारी राजेंद्र भामरे बोलणार आहेत.
दुपारी २:३० वाजता ‘कृत्रिम बुद्धिमत्ता-साहित्य क्षेत्रातील आव्हाने’ या विषयावरील परिसंवादात कार्पोरेट प्रशिक्षक सुनील पाटील, मुकुंद नाडगौडा, एससीईआटीचे उपसंचालक विकास गरड बोलणार आहेत.
दुपारी ४ वाजता यशदातील अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड, अतिरिक्त जिल्हाधिकारी राजीव नंदकर, वाडिया महाविद्यालयातील प्रा. सचिन सानप हे ‘अधिकारी साहित्य संमेलनाची दिशा व भवितव्य’ या विषयावर बोलणार आहेत.
सायंकाळी ५ वाजता संमेलनाचा समारोप समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

