भरमसाठ कर आकारणीचा आरोप करत, तो कमी करण्यासाठी पिस्तुल काढून दिली आत्महत्येची धमकी
पुणे- महापालिकेच्या मिळकत कर आकारणी विभागात जादा कर आकारणी केल्याचा आरोप करत एका मिळकत करदात्याने रिव्हॉल्व्हर उगारून आत्महत्येची धमकी दिल्याने त्याच्याविरोधात शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली.या प्रकरणी कोंढवा खुर्द येथील रहिवासी महेंद्र नरसिंग लोणकर असे गुन्हा नोंदवण्यात आलेल्या मिळकत करदात्याचे नाव आहे. महापालिकेच्या कर आकारणी विभागातील कर्मचारी गणेश दिलीप ठोंबरे (वय ३७, रा. कात्रज) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिळकत कर दाते लोणकर शुक्रवारी (१३ फेब्रुवारी) दुपारी साडेतीनच्या सुमारास कर आकारणी विभागात आले . त्यांनी यावेळी आपल्यावर जादा मिळकत कर आकारण्यात आल्याची तक्रार करत कर कमी करून योग्य मिळकत कर लावा असे सांगत कार्यालयातून उडी मारण्याची धमकी दिली. तसेच, ‘माझ्याकडे परवाना असलेले रिव्हॉल्व्हर आहे,’ असे सांगून त्याने आपल्या पँटच्या खिशातून रिव्हॉल्व्हर काढून दाखवीले. रिव्हॉल्व्हर उगारून त्याने आत्महत्या करण्याची धमकी दिल्याचे ठोंबरे यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस. वलसे करत आहेत.
मिळकतकर विभागात नागरिकांचा छळ:-मिळकतीला कर लावणे, नाव बदलणे, मोकळ्या जागेचा योग्य कर लावणे, मिळकतीच्या वापरता बदल करणे यासह अन्य कामांसाठी नागरिक मिळकतकर विभागात गेले आणि त्यांचे सहजपणे काम झाले असे होत नाही. त्यांना प्रत्येकवेळी वेगवेगळी कागदपत्र मागविणे, नवीन नियम सांगणे, नवीन त्रुटी शोधून काम प्रलंबित ठेवायचे. सगळे व्यवस्थित होत असले तर अचानक फाइल गायब होते असा अनुभव अनेकांना येत आहे. महापालिकेच्या मिळकतकर विभागात नागरिकांचा छळ सुरु आहे. प्रशासनाविरोधात चिड निर्माण होत आहे ही वस्तुस्थिती आहे. मात्र, पारदर्शी आणि गतिमान प्रशासनाच्या गप्पा मारणारे अधिकारी ही व्यवस्था सुधारण्याकडे दुर्लक्ष करत आहेत. मिळकतकर विभागात मुख्य कार्यालयापासून ते क्षेत्रीय कार्यालय स्तरावर नागरिकांना असाच अनुभव येत आहे. कोणाची तरी ओळख असणे, एजंटला पैसे देणे किंवा थेट अधिकारी-कर्मचाऱ्यांना पैसे दिल्याशिवाय कोणतेही काम लगेच होत नाही. त्यामुळे जे नागरिक स्वतः पाठपुरावा करून मिळकतकरात कामे करुण घेत आहेत. त्यांना मिळकतकर विभागातील बाबूगिरीचा अनुभव वारंवर येतो.मिळकतकर विभागात काम घेऊन आलेल्या व्यक्तीचे काम लगेच होत नाही. त्याला अनेक दिवस खेटे मारावे लागतातच. पण एका टेबलावरून दुसऱ्या टेबलवर फाइल जाणे, ती अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देणे यासाठी पाठपुरावा करताना आख्खा दिवस वाया जातो. या कारभारामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

