मुंबई-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासोबत हाणामारी झाल्याचा दावा केला आहे. त्यांनी यासंबंधी एक व्हिडिओ शेअर केला असून, त्यात राहुल नार्वेकर व त्यांच्या सहकाऱ्यांशी एक महिला व व्यक्ती वाद घालताना दिसून येत आहेत. राहुल नार्वेकरांनी ही घटना कुठे व का घडली हे सांगावे अन्यथा मी ती सांगेन, असा इशाराही राऊत यांनी या प्रकरणी विधानसभा अध्यक्षांना दिला आहे.
संजय राऊत यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावर ‘ब्रेकिंग’ असा उल्लेख करत हा व्हिडिओ पोस्ट केला. ‘विधानसभा अध्यक्षांसोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली? राहुल नार्वेकर यांनी पळ काढला आहे! तुम्ही सांगताय की मी सांगू?’ असा थेट सवाल त्यांनी केला आहे. हे ट्विट त्यांनी राहुल नार्वेकरांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही टॅग केले आहे. त्यामुळे या प्रकरणाला अधिकच राजकीय रंग चढला आहे.
संजय राऊत यांनी शेअर केलेल्या व्हिडिओत दिसून येत आहे की, एक महिला आणि एक पुरुष काही कारणावरून राहुल नार्वेकर व त्यांच्या सहकाऱ्यांशी वाद घालत आहेत. घटनास्थळी उपस्थित काहीजण या प्रकरणी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहेत. सदर महिला नार्वेकरांसोबतच्या एका व्यक्तीला मारहाण करतानाही दिसून येत आहे. पण संजय राऊत यांनी दावा केला तसा नार्वेकरांशी धक्काबुक्की झाली आहे का? हे या व्हिडिओत दिसत नाही. हा व्हिडिओ जुना आहे की ताजा? हे ही अजून स्पष्ट झाले नाही. त्यामुळे हा प्रसंग नेमका कोणत्या पार्श्वभूमीवर घडला, तो वैयक्तिक स्वरूपाचा होता की सार्वजनिक कार्यक्रमातील, याविषयी अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
या व्हिडिओवर विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयाकडून अद्याप प्रतिक्रिया आली नाही. सत्ताधारी पक्षानेही यावर अद्याप स्पष्टीकरण दिले नाही. पण संजय राऊत यांनी या प्रकरणी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यात आधीच राजकीय वातावरण तापले असताना या व्हिडिओमुळे आरोप-प्रत्यारोपांच्या नव्या फेरीला सुरुवात होण्याची चिन्हे आहेत. सोशल मीडियावर या व्हिडिओवर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी संजय राऊत यांच्या दाव्याचे समर्थन केले आहे, तर काहींनी व्हिडिओची सत्यता आणि संदर्भ स्पष्ट करण्याची मागणी केली आहे.
अलिबागच्या म्हात्रोळी गावातला व्हिडिओ – काँग्रेस
दुसरीकडे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकरणी राहुल नार्वेकर यांच्यावर टीका केली आहे. तसेच हा व्हिडिओ अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळी गावचा असल्याचाही दावा केला आहे. अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळी गावामध्ये स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात न घेता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे दादागिरी करून शेतीमध्ये मोजणी करण्याचे काम करत होते. स्थानिक शेतकऱ्यांनी केलेल्या विरोधामुळे नार्वेकर यांना अक्षरशः पळ काढावा लागला, असे ते म्हणालेत.

