पुणे-पुण्याला जागतिक दर्जाचे शहर म्हणून विकसित करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नवनिर्वाचित महापौर मंजुषा नागपुरे यांनी सांगितले. महापौरपदाची जबाबदारी स्वीकारताना त्यांनी पुणे शहर देशातील पहिल्या दहा महत्त्वाच्या शहरांमध्ये असल्याचे नमूद केले. जनतेने भाजपवर विश्वास दाखवल्याबद्दल त्यांनी पुणेकरांचे आभार मानले.
नागरी कर्तव्य आणि पर्यावरण याला आपले प्राधान्य राहील, असे महापौर नागपुरे म्हणाल्या. आगामी काळात पुण्यात मोठे प्रकल्प येणार असून, ते सांभाळण्याची जबाबदारी सर्वांची आहे. अंत्योदय विचार, वाहतूक कोंडीमुक्त शहर, आरोग्य सुविधा, शुद्ध पाणीपुरवठा आणि स्वच्छता या नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी आपण समर्थपणे पार पाडू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी आपल्या निवडीबद्दल आश्चर्य व्यक्त केले. मनपा सभागृहात उपमहापौर खुर्चीत बसेन असे स्वप्न कधी पाहिले नव्हते, असे ते म्हणाले. यापूर्वी आपण मनपावर सातत्याने आंदोलने, मोर्चे आणि निवेदने देण्याचे काम केले असल्याचे त्यांनी सांगितले.
झोपडपट्टीत गरिबीत आयुष्य गेले असून, संघर्षमय जीवन जगलो आहे. घरात माझी पत्नी यापूर्वी उपमहापौर झाल्यामुळे मला हे पद मिळेल असे वाटले नव्हते, असे वाडेकर यांनी नमूद केले. भाजपने साथ दिल्याने हे यश मिळाल्याचे सांगत, आपल्या निवडीमुळे आंबेडकरी चळवळीतील अनेकांना आनंद झाल्याचे त्यांनी सांगितले.
भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी महापौर आणि उपमहापौर यांचे अभिनंदन केले. राजकीय परिवारात खेळीमेळीचे आणि विश्वासाचे वातावरण असते, असे ते म्हणाले. विरोधकांनी बिनविरोध निवडणुकीसाठी पाठबळ दिल्याचे त्यांनी नमूद केले. पुणेकरांनी निर्णायक मतदान भाजपला केले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास दाखवला असल्याचे घाटे यांनी सांगितले.
पुणेकर सुजाण असून, त्यांनी कामाची जबाबदारी भाजपवर दिली आहे. महापौर आणि उपमहापौर यांनी सर्वसामान्य व्यक्तींना केंद्रबिंदू ठेवून काम करावे, अशी अपेक्षा घाटे यांनी व्यक्त केली. महापौर नागपुरे यांचे कुटुंब हिंदुत्ववादी असून, त्या छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत काम करतील, असे त्यांनी सांगितले. तसेच, आंबेडकर चळवळीत काम करणाऱ्या परशुराम वाडेकर यांना उपमहापौर पदासाठी संधी दिली गेली आहे. आगामी निवडणुकीत भाजप सभागृहात १२० चा सदस्यांचा आकडा पार करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

