मुंबई दि.८: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस म्हणजे केवळ राजकीय सोहळा नव्हे, तर माणुसकी आणि सामाजिक बांधिलकी असते. याच भावनेतून, त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुंबईतील सर जे.जे. रुग्णालयात नवमाता आणि नवजात बालकांसाठी ‘वस्त्रदानाचा’ हृदयस्पर्शी उपक्रम पार पडला. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला.
आई होण्याच्या आनंदात आणि प्रसूती वेदनेतून सावरणाऱ्या मातांसाठी तसेच या जगात पहिले पाऊल टाकणाऱ्या चिमुकल्या जीवांसाठी हे वस्त्रदान म्हणजे मायेची ऊब ठरली. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्वतः नवमातांशी संवाद साधत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि बालकांना मायेने वस्त्रे अर्पण केली. अनेक गरजू मातांच्या डोळ्यांत यावेळी समाधानाचे अश्रू तर ओठांवर कृतज्ञतेचे शब्द उमटले.
या उपक्रमादरम्यान डॉ. नीलम गोऱ्हे यांनी रुग्णालयातील सोयी-सुविधांचा आढावा घेतला. जे.जे. प्रशासनाने दिलेल्या सर्व प्रस्तावांवर शासन दरबारी सकारात्मक पाठपुरावा करणार असून, आगामी अधिवेशनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार बैठक घेण्यात येईल असे देखील त्यांनी सांगितले. तसेच, रुग्णालयातील वॉर्ड्सच्या नूतनीकरणासाठी डॉ. गोऱ्हे स्वतः विशेष प्रयत्न करणार आहेत.
मुंबईतील या यशस्वी उपक्रमानंतर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे येथेही डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शहर संघटक आनंद गोयल यांच्या माध्यमातून अशाच प्रकारच्या सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
यावेळी शिवसेना उपनेत्या कला शिंदे, दिलीप नाईक, जितेंद्र सपकाळ, संपर्कप्रमुख वर्षा मोरे, महिला विभागप्रमुख नीलम पवार, रेखा सुरणकर, पुणे शहर संघटक आनंद गोयल, अल्का माने, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. वैशाली वाढे, संतोष सावंत, जन्नत परवीन आदी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचबरोबर या कार्यक्रमास रुग्णालयातील वैद्यकीय डीन डॉ.संजय सुरासे, डॉ.विजय कल्याणकर, डॉ.सोनाली देशमुख, डॉ.अरुण राठोड, डॉ.मयुरी वावधने, डॉ.अर्चना पाटील, चित्रा सेलवराज, नितीन कोलंबकर यांच्यासह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
जे जे हॉस्पिटलमधील जवळपास सर्व म्हणजे निवासी १००० रुग्णांना अन्नदानही करण्यात आले.माणुसकीच्या स्पर्शाने उजळलेला हा वाढदिवस अनेकांच्या आयुष्यात उत्साहाचा किरण ठरला असून, सर्वांनी लाडक्या उपमुख्यमंत्र्यांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या

