मुंबई : एकीकडे अट्रॉसिटी सारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी बिल्डर सुशील रहेजा अद्याप मोकळा असताना, दुसरीकडे त्याच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना मुंबई पोलिसांनी तडकाफडकी अटक केल्याने खळबळ माजली आहे.
विशेष म्हणजे, सर्वोच्च न्यायालयाचे नियम धाब्यावर बसवून महिला पदाधिकाऱ्यांना काल सायंकाळी ७ वाजेनंतर अटक केल्याने वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक झाले.
नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, भाजप समर्थक मानले जाणारे बिल्डर सुशील रहेजा यांच्यावर अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल आहे. मात्र, त्यांना अटक करण्यात टाळाटाळ करणाऱ्या पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. याच प्रकरणी जाब विचारण्यासाठी गेलेले वंचित बहुजन युवा आघाडीचे मुंबई अध्यक्ष सागर गवई, मुंबई महिला आघाडी अध्यक्ष स्नेहल सोहनी आणि इतर कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर सवाल या अटकेनंतर राजकीय वर्तुळात आणि समाजमाध्यमांवर संताप व्यक्त केला जात आहे. कायद्यानुसार कोणत्याही महिलेला सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयापूर्वी (विशेष परिस्थिती वगळता आणि दंडाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय) अटक करता येत नाही. मग स्नेहल सोहनी आणि इतर महिलांना सायंकाळी ७ वाजेनंतर कोणत्या कायद्याच्या आधारे अटक केली? असा सवाल वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. तसेच ज्या तत्परतेने आंदोलकांना अटक करण्यात आली, तीच तत्परता गंभीर गुन्ह्यातील आरोपी सुशील रहेजाला अटक करताना का दाखवली जात नाही? पोलीस प्रशासन सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आला आहे. गंभीर गुन्ह्यातील आरोपी मोकाट फिरत आहेत आणि न्यायासाठी लढणाऱ्या महिलांना रात्रीच्या वेळी अटक केली जात आहे. पोलीस प्रशासनाने याचे उत्तर द्यावे की हा कोणता कायदा आहे? असे मत कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. या प्रकरणाने आता जोर धरला असून, वंचित बहुजन आघाडीने या अटकेचा तीव्र निषेध केला आहे. अट्रॉसिटी गुन्ह्यातील आरोपीला वाचवण्यासाठी पोलीस प्रशासन आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप होत आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना अटक केल्याने मध्यरात्रीपासून भिवंडी पोलिस चौकीत वंचितचे कार्यकर्ते आंदोलन करत होते. आणि प्रशासनाला जाब विचारला.

