मुंबई- अभिनेते सयाजी शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याची चर्चा आमच्या पुढेच झाली होती, असा दावा करत एकच खळबळ उडवून दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र यावेत हे अजित पवारांचे स्वप्न होते. आमच्यापुढेच एकत्र येण्याची चर्चा झाली होती, असे त्यांनी म्हटले आहे. अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा आता थंड पडलेली असताना या दाव्याने भाजप आणि अजितदादा गटाच्या काही नेत्यांकडे पुन्हा एकदा संशयाने पाहिले जाऊ लागणार आहे. सयाजी शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा आपल्यापुढेच झाली होती असाही दावा केला. आमच्यासमोर बोलणे झाले होते की, हे आता सर्व एकत्रपणे सुरू होईल. पण आता ते अचानक असे घडल्यामुळे कुणी त्याला वेगळे वळण देऊ नये. दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन हे काम पुढे नेले तरच महाराष्ट्र चांगला राहील. विकसित महाराष्ट्र होईल, असे सयाजी शिंदे म्हणाले.
सयाजी शिंदे यांनी रविवारी एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधला. त्यात त्यांनी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी एकत्र येण्याची भावना व्यक्त केली. ते म्हणाले, अजित पवारांनी सर्वधर्म समभाव घेऊन, गरीब – श्रीमंत न पाहता, खालून आल्यामुळे सर्वकाही खूप पुढे घेऊन जाण्याचे ठरवले होते. मला असे वाटते की, त्यांचे हे स्वप्न आपण सगळ्यांनी स्पेशली सुनेत्रा वहिनी, सुप्रिया ताई व पवारांनी पुढे न्यायला पाहिजे. दोन्ही गट एकत्र यावेत हे दादांचे पहिले स्वप्न होते. त्यांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण व्हावे अशी आमची इच्छा आहे. असे झाले तरच महाराष्ट्राची ताकद वाढेल.महाराष्ट्राची ताकद वाढवायची असेल तर दोन्ही पवार कुटुंबांनी ताबडतोब एकत्र आले पाहिजे. त्यांचे काही कौटुंबीक इगो असतील किंवा त्यांच्या काही भावना असतील तर त्या त्यांनी बाजूला ठेवल्या पाहिजे, असे ते म्हणाले.
उल्लेखनीय बाब म्हणजे अजित पवार यांचा गत 28 जानेवारी रोजी विमान अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांत सुरू असलेली विलीनीकरणाची चर्चा थंडावली आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या नेत्यांनी अजित पवार विलीनीकरणासाठी आग्रही होते असा ठाम दावा केला आहे. पण सत्ताधारी राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आदी नेत्यांनी शरद पवार गटाशी अशी कोणतीही चर्चा सुरू नव्हती, असे स्पष्ट करत त्यांचा दावा फेटाळून लावला आहे. पण आता सयाजी शिंदे यांनी विलीनीकरणाची चर्चा माझ्यापुढेच झाली होती असा दावा केला आहे.

