मुंबई- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. या शताब्दी वर्षाचे औचित्य साधून मुंबईत ‘संवाद’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वरळी येथील नेहरू सेंटर सभागृहात शनिवारपासून ‘नवे क्षितिज’ ही दोन दिवसीय व्याख्यानमाला सुरू झाली असून, याच्या उद्घाटन सोहळ्याला ग्लॅमर जगतातील दिग्गजांनी हजेरी लावत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
या कार्यक्रमाचे सर्वात मोठे आकर्षण ठरले ते म्हणजे बॉलिवूड अभिनेता सलमान खान. एरवी राजकीय किंवा वैचारिक व्यासपीठांपासून काहीसा दूर राहणारा सलमान खान जेव्हा संघाच्या कार्यक्रमात दाखल झाला, तेव्हा उपस्थितांमध्ये एकच चर्चा सुरू झाली. सलमान खान सभागृहात येताच सर्व कॅमेऱ्यांचे लक्ष त्याच्याकडे वळाले. त्याच्याभोवती चाहत्यांचा आणि मान्यवरांचा गराडा पडला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या वैचारिक व्यासपीठावर सलमानची उपस्थिती ही या सोहळ्याचा ‘शो स्टॉपर’ क्षण ठरली.
आरएसएसच्या कार्यक्रमाला केवळ सलमान खानच नव्हे, तर बॉलीवूडमधील अनेक बड्या हस्ती या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. ज्येष्ठ अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी यांनी आपली उपस्थिती दर्शवली. तरुण पिढीचा सुपरस्टार रणबीर कपूर यानेही या संवाद कार्यक्रमात सहभाग घेतला. सिद्ध दिग्दर्शक सुभाष घई आणि ज्येष्ठ अभिनेत्री अश्विनी भावे यांनीही या व्याख्यानमालेत हजेरी लावली. याव्यतिरिक्त मुंबईतील विविध क्षेत्रांतील निमंत्रित मान्यवर आणि उद्योजकही या सोहळ्याला उपस्थित होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपले शताब्दी वर्ष मोठ्या भव्यदिव्य स्वरूपात साजरे करत आहे. मुंबईतील हा कार्यक्रम त्याचाच एक भाग असून, विविध क्षेत्रांतील प्रभावशाली व्यक्तींपर्यंत संघाचा विचार पोहोचवणे हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले जात आहे. नेहरू सेंटरमधील या कार्यक्रमामुळे वैचारिक शिस्त आणि चित्रपटसृष्टीचे ग्लॅमर यांचे एक वेगळेच मिलन मुंबईकरांना अनुभवायला मिळाले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे या दोन दिवसीय व्याख्यानमालेतून उपस्थितांना संबोधित करत आहेत. ‘नवे क्षितिज’ या संकल्पनेतून संघाची भविष्यातील वाटचाल, राष्ट्रनिर्माण आणि सामाजिक समरसता या विषयांवर ते भाष्य करत आहेत.

