हवेली (पुणे):
हवेली तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी वापरण्यात आलेल्या ईव्हीएम मशीन सुरक्षित ठेवण्यासाठी स्ट्रॉंग रूममध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. स्ट्रॉंग रूम परिसरात २४ तास सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे सतत निगराणी ठेवण्यात येत असून, मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्व ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूममध्ये ठेवून सील करण्यात आल्या. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक, सुरक्षित व नियमबद्ध पद्धतीने पार पाडण्यात आली.
ईव्हीएम स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षेच्या दृष्टीने अधिकृत परवानगीशिवाय कोणालाही स्ट्रॉंग रूम परिसरात प्रवेश दिला जात नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने, सहाय्यक निवडणूक अधिकारी अर्चना निकम, तृप्ती कोलते तसेच माध्यम अधिकारी प्रा. योगेश हांडगे,माध्यम कक्षाचे राम कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण सुरक्षा व तांत्रिक व्यवस्थापन राबविण्यात येत आहे. नोडल अधिकारी सचिन आखाडे यांच्या समन्वयातून मतदानाच्या दिवशी ईव्हीएमशी संबंधित सर्व तांत्रिक बाबी प्रभावीपणे हाताळण्यात आल्या.
या तांत्रिक व सुरक्षा व्यवस्थेत सचिन आखाडे, किशोर पाटील, गजानन किरवले, महादेव दुधाळ, विवेक गावंडे, राजू राजपुरे व अनिल पाटील या अधिकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मतमोजणीपर्यंत ईव्हीएम सुरक्षित राहाव्यात यासाठी निवडणूक अधिकारी, पोलीस प्रशासन व सुरक्षा यंत्रणेमार्फत नियमित तपासणी करण्यात येत आहे.
स्ट्रॉंग रूमवरील कडेकोट बंदोबस्त, सीसीटीव्ही व्यवस्था, सील प्रक्रिया व प्रशासनाच्या सतर्कतेमुळे मतदारांनी समाधान व्यक्त केले आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया सुरक्षित, पारदर्शक व विश्वासार्ह असल्याचा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
हवेली निवडणूक कार्यालयाच्या EVM स्ट्रॉंग रूमवर कडेकोट सुरक्षा; २४ तास सीसीटीव्ही निगराणी
Date:

