पुणे : पुण्याचे माजी महापौर आणि ज्येष्ठ नेते शांतीलाल सुरतवाला यांचे आज पहाटे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तीव्र दुःख व्यक्त करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.
शांतीलाल सुरतवाला यांच्या आठवणींना उजाळा देताना डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, “सुरतवालाजींशी माझा गेल्या ३५ वर्षांपासूनचा ऋणानुबंध होता. पुणे शहराच्या सार्वजनिक जीवनात एक सक्रिय नागरिक, अभ्यासू कार्यकर्ता आणि लोकाभिमुख नेता म्हणून त्यांची ओळख जनमानसात कायम राहील. सर्वपक्षीय नेत्यांशी त्यांचा असलेला सुसंस्कृत संवाद आणि कामातील सुजाणपणा हा वाखाणण्याजोगा होता.”
शांतीलाल सुरतवाला हे सहिष्णू आणि समजूतदार राजकारणाचे खंदे प्रतिनिधी होते. अनेक सामाजिक व राजकीय कार्यक्रमांच्या निमित्ताने आम्हाला एकत्र काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या निधनामुळे पुणे शहराने एक अनुभवी, संयमी आणि सर्वसमावेशक नेतृत्व गमावले आहे. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील समन्वय साधणारा एक महत्त्वाचा दुवा आज नाहीसा झाला आहे.
“मी शांतीलाल सुरतवाला यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते आणि त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती प्रदान करो,” अशा शब्दांत डॉ. गोऱ्हे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

