पुणे-राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती व येथे राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाची भावना ही पोरकेपणाची झाली होती. परंतु, आज अजित पवारांच्या अस्थि विसर्जनानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार हे स्वतः बारामतीमध्ये सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज बारामती येथे शरद पवारांकडून नीरा नदीची पाहणी करण्यात आली.
अजित पवारांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. विशेषतः बारामतीमध्ये सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळत आहे. अजित पवारांनी बारामतीचा कायापालट केला आहे, आता अजितदादानंतर बारामतीकडे कोण बघणार, इथल्या लोकांच्या समस्या कोण बघणार, असा प्रश्न बारामतीकरांना पडला होता. परंतु, अजित पवारांच्यानंतर आता शरद पवार बारामतीमध्ये सक्रिय झाले आहेत. त्यांनी येथील नीरा नदीची पाहणी केली आहे.
नीरा नदीबद्दल सातत्याने चर्चा होती की नीरा नदी प्रदूषित झाली आहे. आता त्याची पाहणी करून यासंदर्भात शरद पवारांनी माहिती घेतली आहे. अजितदादांच्या निधनाने शरद पवार खचल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र, आज शरद पवारांनी पुन्हा कामाला सुरुवात करत बारामतीकरांना विश्वास धीर देण्यासाठी सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे.
शरद पवार जेव्हा नीरा नदीची पाहणी करण्यासाठी पोहोचले तेव्हा येथील स्थानिकांनी कार्यकर्त्यांनी येथील तक्रारी व समस्या मांडल्या. नदीचे पाणी क्षारयुक्त झाले असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या दूषित पाण्यामुळे शेतीवर परिणाम होत असून जमिनी सुद्धा क्षारपट झाल्याचे येथील स्थानिकांनी सांगितले आहे. तसेच नीरा नदीत कारखान्याचे दूषित पाणी सोडल्याने नदीचे पाणी खराब झाले आहे. यावर कारखान्यांनी आता वेस्ट पाणी टाकणार नाही असे सांगितले असेल तरी इतर अनेक घटकांमुळे पाणी दूषित होत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
यावेळी शरद पवारांनी नदीच्या भागातील सर्व कारखान्यांची नावे घेतली. ज्यातून दूषित पाणी येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या कारखान्यांचे जे दूषित पाणी येत आहे, ते नदीत सोडण्यापेक्षा बॉयलर सिस्टम आणावी, अशी मागणी स्थानिकांनी शरद पवारांकडे केली आहे. अजित पवारांनी देखील खूप लक्ष घातले असल्याची आठवण देखील यावेळी स्थानिकांनी सांगितली.
अनेक वर्षांपासून बारामतीची जबाबदारी शरद पवारांनी अजित पवारांकडे सोपवली होती. त्यानंतर शरद पवार हे देशाच्या राजकारणात सक्रिय होते. अजित पवारांनी बारामतीचा कायापालट केला. अनेक विकासकामे इथे केली. मात्र, अजितदादांच्या अकाली निधनानंतर आता शरद पवारांनी पुन्हा एकदा बारामतीचे सूत्र हाती घेतल्याचे पाहायला मिळत आहे.

