पणजी, : गोवा सरकारच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने आज राज्यात डिजिटल कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी स्टारलिंक सॅटेलाइट कम्युनिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेडसोबत सामंजस्य करार (MoU) केला.
हा सामंजस्य करार आल्तिन्हो येथील मुख्यमंत्री निवासस्थानी करण्यात आला. गेल्या महिन्यात स्टारलिंकच्या अधिकाऱ्यांनी आणि माननीय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यासाठी हाय-स्पीड सॅटेलाइट इंटरनेटवर चर्चा करण्यासाठी घेतलेल्या बैठकीनंतर हा सामंजस्य करार करण्यात आला आहे. चर्चेपासून करारापर्यंतची ही जलद प्रगती, विशेषतः दुर्गम भागांमधील कनेक्टिव्हिटीची दरी कमी करण्यावर सरकारचे लक्ष असल्याचे दर्शवते.
दुर्गम भागात हाय-स्पीड इंटरनेट उपलब्ध होणार:- मुख्यमंत्री
या प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “या सामंजस्य करारामुळे दुर्गम भागात विश्वसनीय हाय-स्पीड सॅटेलाइट इंटरनेट उपलब्ध करून गोव्यातील डिजिटल कनेक्टिव्हिटी सुधारण्यास मदत होईल. यामुळे शाळा, आरोग्य सुविधा आणि सार्वजनिक संस्थांमध्ये चांगल्या सेवांना पाठिंबा मिळेल आणि आपत्कालीन प्रतिसादाला बळकटी मिळेल.”
यावेळी माहिती तंत्रज्ञान मंत्री रोहन खंवटे, स्टारलिंकचे प्रतिनिधी प्रभाकर जयकुमार, कंट्री हेड, स्टारलिंक इंडिया, पर्णिल उर्ध्वरेशे, संचालक, स्टारलिंक आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

