पुणे-पुणे महानगरपालिका व ICLEI Local Governments for Sustainability, South Asia यांचे संयुक्त विद्यमाने पुणे शहरातील ई-कचरा (E-Waste) व्यवस्थापन प्रणाली अधिक सक्षम करण्यासाठी “Green Byte” प्रकल्पाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती घनकचरा विभागाचे उपायुक्त अविनाश सकपाळ यांनी दिली.
पुणे शहराची आजमितीस लोकसंख्या सुमारे ७० ते ८० लक्ष असून पुणे महानगरपालिकेचे कार्यक्षेत्र सुमारे ५१६ चौ.मी. आहे. शहरामध्ये माहिती-तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढत असून त्यातून निर्माण होणाऱ्या ई-कचऱ्याचे (E-Waste) प्रमाण सातत्याने वाढत आहे. ज्यामध्ये Laptop, Washing machines, / Televisions, Mobile Phone इ. चा समावेश होतो. ई-कचऱ्याचे योग्य संकलन, वर्गीकरण, पुनर्वापर व पर्यावरणपूरक विल्हेवाट न लावल्यास पर्यावरणीय व आरोग्यविषयक धोके निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिकेमार्फत ई-कचरा व्यवस्थापन अधिक सक्षम, शाश्वत व परिणामकारक करण्याची आवश्यकता आहे.
Local Governments for Sustainability, South Asia ही संस्था शाश्वत विकास, पर्यावरण संरक्षण व शहरी घनकचरा व्यवस्थापन क्षेत्रात कार्यरत असलेली नामांकित आंतरराष्ट्रीय संस्था असून, स्थानिक स्वराज्य संस्थांना तांत्रिक मार्गदर्शन, क्षमता वृद्धी व धोरणात्मक सहाय्य पुरविते.
पुणे महानगरपालिका व ICLEI – Local Governments for Sustainability, South Asia यांचे संयुक्त विद्यमाने पुणे शहरातील ई-कचरा ( E-Waste) व्यवस्थापन प्रणाली अधिक सक्षम करण्यासाठी “Green Byte ” प्रकल्पाचे आयोजन करण्यात आले असून त्या अनुषंगाने पुणे महानगरपालिका व संबंधीत ICLEI – Local Governments for Sustainability, South Asia संस्था यांचे दरम्यान कामाचा करारनामा देखील करण्यात आला आहे.
महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (ज) पवनीत कौर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत असून यामध्ये अविनाश सकपाळ, मा. उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन, प्रज्ञा पोतदार पवार, सहाय्यक आयुक्त, घनकचरा व्यवस्थापन तसेच ICLEI दक्षिण आशिया संस्थेकडील प्रतिनिधी इमानी कुमार, कार्यकारी संचालक आणि सौम्या चतुर्वेदुला, संचालक यांचा समावेश आहे.
ग्रीन बाइट पुणे उपक्रम हा ई-कचरा प्रशासनातील विद्यमान तफावत दूर करण्यासाठी आणि कार्यक्षम ई-कचरा व्यवस्थापन प्रणाली तयार करण्यासाठी राबविण्यात येत आहे. पुणे महानगरपालिकेच्या सहकार्याने औपचारिकीकरण, डेटा पारदर्शकता आणि बहु- भागधारक दृष्टिकोनाद्वारे शहराच्या ई-कचरा व्यवस्थापन परिसंस्थेला बळकटी देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
याव्यतिरिक्त, पुण्यातील घनकचरा व्यवस्थापन प्रणाली मजबूत करण्यासाठी ICLEI दक्षिण आशिया संस्थेमार्फत सल्लागार म्हणून सहाय्य देखील करण्यात येणार आहे.

