मराठी भाषा, संस्कृतीचा सेवक म्हणून विनोद कुलकर्णी यांचे संमेलनात कार्य : डॉ. श्रीपाल सबनीस
पुणे : सांस्कृतिक लोकशाही जपण्यासाठी साहित्य संमेलनांची आवश्यकता असून राजकीय लोकशाही सदृढ करण्यासाठी आधी सांस्कृतिक लोकशाही बळकट करणे गरजेचे आहे. मराठी साहित्य संमेलनांच्या माध्यमातून संस्कृती व साहित्य क्षेत्रात संवादाचे वातावरण घडते. अशा साहित्य संमेलनात कार्याध्यक्षाची भूमिका बजाविताना विनोद कुलकर्णी यांनी मराठी भाषा, संस्कृतीचा सेवक म्हणून कार्य केले हे अभिनंदनीय आहे, असे गौरवोद्गार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी काढले.
सातारा येथील ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे यशस्वीरित्या आयोजन केल्याबद्दल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मराठी अभ्यास मंडळ व अक्षर भारती आणि लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांचा आज (दि. २०) नागरी सत्कार करण्यात आला. त्या वेळी डॉ. श्रीपाल सबनीस बोलत होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, ज्येष्ठ विचारवंत प्रा. जे. पी. देसाई, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. संदीप सांगळे, मराठी साहित्य परिषदेचे कार्यवाह, लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिरीष चिटणीस, अविनाश सांगोलेकर मंचावर होते. शाल, ग्रंथ आणि भेटवस्तू असे सन्मानाचे स्वरूप होते.
मराठी भाषेसाठी सर्व जातीधर्मातील साहित्यिकांचे अनमोल योगदान लाभले आहे. विनोद कुलकर्णी यांनी कार्यकुशलतेने साहित्य संमेलनांच्या माध्यमातून सामान्य जनतेसह सर्व जातीधर्माच्या साहित्यिक, साहित्यप्रेमी व्यक्तींना एकत्रित केले, असे सांगून डॉ. श्रीपाल सबनीस पुढे म्हणाले, आपले व्यवस्थापन कौशल्य पणाला लावत कार्यकर्ता ते नेता अशा भूमिका निभावत विनोद कुलकर्णी महाराष्ट्रातील बारा कोटी मराठी जनतेच्या विश्वासास पात्र ठरले आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या माध्यमातून विनोद कुलकर्णी यांनी हिंदी भाषा सक्तीला राजकीय व्यक्तींसमोर ठामपणे विरोध करत आपली भूमिका विनम्रपणे मांडली हे कौतुकास्पद आहे.
मराठी भाषा ही भाकरीची आणि ज्ञानाची व्हावी या दोन टोकांच्या अपेक्षांमध्ये साहित्य संमेलने अडकलेली आहेत. असे असतानाही प्राणापेक्षा भाषेला मान देण्याचे कार्य साहित्य संमेलनांच्या माध्यमातून घडत आहे, असेही डॉ. श्रीपाल सबनीस यांनी आवर्जून नमूद केले.
साहित्य क्षेत्रातील एव्हरेस्ट सर केल्याचा आनंद : विनोद कुलकर्णी..
साताऱ्यात साहित्य संमेलन व्हावे ही मागणी ते संमेलनाच्या यशस्वी आयोजनापर्यंतचा प्रवास उलगडताना विनोद कुलकर्णी म्हणाले, साहित्य संमेलन आयोजनाच्या स्वप्नाचा पाठलाग करत त्या करीता अखंडितपणे कृती करत वाटचाल सुरू ठेवली. सातारा येथील साहित्य चळवळीला पुन्हा एकदा सक्रिय करत साहित्य परिषदेशी एकरूप होऊन विरोधी पक्षाला सामावून घेत अखंडितपणे कार्य करत राहिलो. यातूनच पाहिलेल्या एका स्वप्नामुळे न पाहिलेली अनेक स्वप्ने देखील साकार झाली. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा याकरिता केलेले प्रयत्न, आंदोलने यांसह शतकपूर्व संमेलन साकारताना आधीच्या संमेलनांमधील त्रुटी व उणीवा दूर करण्यासाठी केलेला अट्टाहास याविषयीही त्यांनी अवगत केले. साताऱ्यातील संमेलन सर्वच बाबतीत विक्रमी ठरावे यासाठी सहकाऱ्यांसह केलेले अविरत प्ररिश्रम, साहित्यिकांना व मान्यवरांना चांदीच्या ताटात दिलेले भोजन, माजी संमेलनाध्यक्षांचा यथोचित सन्मान, ग्रंथविक्रेत्यांच्या अपेक्षांची पूर्तता, अभूतपूर्व ग्रंथदिंडी, चित्ररथ, शंभरी पार केलेल्या शि. द. फडणीस यांनी साकारलेले बोधचिन्ह, निधी संकलन, सुरक्षा व्यवस्था आदी बाबींवर त्यांनी प्रकाश टाकला. नकारात्मक घटनेतून विरोधक, द्वेष करणाऱ्यांनाही आनंद दिला, असे सांगत साहित्य संमेलन यशस्वी केले हा साहित्य क्षेत्रातील एव्हरेस्ट शिखर सर केल्याचा आनंद आहे, असेही ते आवर्जून म्हणाले.
मराठी भाषेसाठी दीर्घकालीन नियोजन आवश्यक : डॉ. पराग काळकर
डॉ. पराग काळकर म्हणाले, विनोद कुलकर्णी यांच्या नेतृत्वातून ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजन उत्तम झाले. प्रत्येक व्यवस्था चोख ठेवण्याचा निर्धार पूर्ण करण्यात आला. साताऱ्याची कीर्ती जगभरात वाढविण्याचे कार्य या संमेलनाद्वारे झाले आहे. ते पुढे म्हणाले, मराठी भाषेला अभिजाततेचा दर्जा मिळाल्यानंतर अनेक उत्सव, समारंभ झाले. परंतु मराठी भाषा जनमानसापर्यंत जाण्यासाठी दीर्घकालीन नियोजन करणे आवश्यक असून संशोधनाव्यतिरिक्तही मराठी भाषेसाठी कार्य व्हावे, याकरिता विद्यापीठ स्तरावर भविष्यात विविध उपक्रम राबवू.
प्रा. जे. पी. देसाई म्हणाले, विनोद कुलकर्णी हे आदर्श प्रशासक असून त्यांनी संमेलनाच्या यशस्वीतेतून त्यांची कार्यक्षमता, कर्तव्यदक्षता आणि सृजनशीलता दर्शविली आहे. पुढील संमेलनांसाठी नवीन वाटा निर्माण करण्याचे कार्य केले असून आपले साध्य पूर्ण करण्यासाठी पवित्र साधनांचा वापर केलेल दिसतो. प्रा. संदीप सांगळे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाची भूमिका शिरीष चिटणीस यांनी मांडली तर प्रास्ताविक स्वप्नील पोरे यांनी केले. आभार अविनाश सांगोलेकर यांनी मानले.

