पुणे.दि.१९: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते अरुण गिरे यांनी आज आपल्या शेकडो समर्थकांसह शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. शिवसेना नेत्या आणि विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलमताई गोऱ्हे यांच्या हस्ते त्यांचा पक्षात प्रवेश झाला.
या महत्त्वपूर्ण पक्षप्रवेशावेळी शिवसेना सचिव रामभाऊ रेपाळे, माजी मंत्री विजयबापू शिवतारे, आमदार शरद सोनवणे, शिवसेना जिल्हाप्रमुख देविदास दरेकर, भगवान पोखरकर आणि रमेश बापू कोंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
अरुणभाऊ गिरे यांच्या रूपाने आंबेगाव तालुक्यातील एक अभ्यासू आणि तरुण नेतृत्व शिवसेनेत आल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे.
यावेळी युवासेना कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर, युवानेते रमेशभाऊ येवले, उपजिल्हाप्रमुख प्रकाश वाडेकर, सरपंच रविंद्र वळसे पाटील आणि युवासेना तालुका अध्यक्ष योगेश थोरात यांच्यासह जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी, सरपंच आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील जनसेवेचा आणि विकासाचा रथ अधिक वेगाने पुढे नेण्याचा निर्धार यावेळी अरुणभाऊ गिरे यांनी व्यक्त केला. या प्रवेशामुळे आंबेगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

