- बास्केटबॉल लीगच्या विस्तारासाठी एसीजी स्पोर्ट्सची भागीदारी
- अनिरुद्ध पोळे व राहुल झा यांची माहिती
देशातील पहिल्या व्यावसायिक बास्केटबॉल लीग, तसेच या खेळाला पोषक वातावरण उभारण्यास चालना देण्यासाठी एसीजी स्पोर्ट्सने एबीसी बास्केटबॉल डेव्हलपमेंट लीग यांच्यासोबत भागीदारी केली आहे. महाराष्ट्र बास्केटबॉल लीग १४ ते २१ मार्चदरम्यान पुण्यातील खराडी येथील राजाराम भिकू पठारे स्टेडियमवर होणार आहे. या स्पर्धेत आठ मुलांच्या आणि पाच मुलींच्या संघांचा सहभाग असणार आहे, अशी माहिती एसीजी स्पोर्ट्सचे स्ट्रॅटेजिक हेड राहुल झा आणि एबीसी बास्केटबॉल डेव्हलपमेंट लीगचे संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध पोळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. विमाननगर येथील फोर पॉइंट्स शेरेटोन हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेवेळी केरळ बास्केटबॉल संघटनेचे सचिव पी. सी. अँटोनी, तेलंगणा बास्केटबॉल संघटनेचे सचिव पृथ्वी रेड्डी आणि दिल्ली बास्केटबॉल संघटनेचे अध्यक्ष मुकेश कालिया उपस्थित होते.
अनिरुद्ध पोळे म्हणाले, “एसीजी स्पोर्ट्स व एबीसी बास्केटबॉल डेव्हलपमेंट लीग यांच्या एकत्रित प्रयत्नातून राज्य व देशपातळीवर बास्केटबॉल खेळाला प्रोत्साहन दिले जाणार आहे. तळागाळातील खेळाडूंना उच्च दर्जाचे प्रशिक्षण देऊन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये संधी दिली जाईल. २०२६ मध्ये महाराष्ट्र, केरळ, दिल्ली आणि तेलंगणामध्ये १४ व १८ वर्षांखालील गटांसाठी सात लीग आयोजित केल्या जाणार आहेत. पुढच्या टप्प्यात आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश व हरियाणा-चंदीगड येथेही बास्केटबॉल लीग भरविण्यात येणार आहेत.”

