ओबीसी बहुजन पक्ष व काँग्रेसची आघाडी, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका एकत्रित लढणार.
भिवंडी महानगरपालिकेतील काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगसेवकांचा प्रदेशाध्यक्षांच्या हस्ते सत्कार
मुंबई, दि. १९ जानेवारी २०२६
प्रकाश शेंडगे यांच्या नेतृत्वाखालील ओबीसी बहुजन आघाडी व काँग्रेस पक्षाची आघाडी झाली आहे. ही एक वैचारिक आघाडी असून आगामी जिल्हा परिषद निवडणुका एकत्रित लढू असा निर्णय यावेळी घेण्यात आल्याची घोषणा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज पत्रकार परिषदेत केली.
ओबीसी बहुजन पक्षाचे नेते प्रकाश आण्णा शेंडगे यांनी त्यांचे सहकारी चंद्रकांत बावकर, जे. टी. तांडेल, पांडुरंग मिरगळ यांनी टिळक भवन येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांसोबत सविस्तर चर्चा केली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आघाडीची घोषणा केली, ते पुढे म्हणाले की, ओबीसी बहुजन आघाडीने काँग्रेससोबत काम करण्याचा निर्णय घेतला त्याचे मी स्वागत करतो. ही आघाडी केवळ सत्तेसाठी नसून एका व्यापक भूमिकेतून सामाजिक न्यायासाठी झाली आहे. राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणनेची आग्रही मागणी केल्यानंतर मोदी सरकारला त्याचा निर्णय घ्यावा लागला पण अजून ही जातनिहाय जनगणना झालेली नाही. ज्यांची जेवढी लोकसंख्या तेवढी भागिदारी ही काँग्रेसची भूमिका आहे. राहुल गांधी यांच्या या भूमिकेला सर्व समाजातून पाठिंबा मिळत आहे. धनगर, ओबीसी समाजाचे योग्य प्रतिनिधित्व असावे यावर भर दिला जाईल.
भाजपाची सत्ता आल्यावर पहिली सही धनगर समाजाच्या आरक्षणाची करेन असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीमध्ये २०१४ साली दिले होते पण आजपर्यंत त्याची पूर्तता केलेली नाही. फडणवीस यांनी धनगर, ओबीसी, मराठा, आदिवासी समाजाची आरक्षणाच्या नावाखाली फसवणूक केली आहे. जाती जातीत भांडणे लावण्याचे काम त्यांनी केले आहे. या समाजाचा भाजपा व फडणवीस यांच्यावरचा विश्वास उडाला आहे, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
यावेळी प्रकाश शेंडगे म्हणाले की, ओबीसी आरक्षणाचे लचके तोडण्याचे काम केले जात असून २७ टक्के आरक्षणावरही घाला घातला जात आहे. जीआर वर जीआर काढले जात आहेत पण कोणत्याच समाजाला त्याचा फायदा होत नाही. ओबीसी समाजाला न्याय मिळावा यासाठी स्वतंत्र पक्षाची स्थापना करुन समविचारी पक्षाशी आघाडी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जातनिहाय जनगणनेची भूमिका घेतल्याबद्दल राहुल गांधी यांचे आम्ही आभार मानतो. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालीच ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल, असा विश्वास प्रकाश शेंडगे यांनी व्यक्त केला.
भिवंडी महापालिकेतील नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार..
भिवंडी महानगरपालिकेत काँग्रेस पक्षाचे ३० नगरसेवक विजयी झाले आहे. आज टिळक भवन येथे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते या नवनिकर्वाचित नगरसेकांचा सत्कार सोहळा पार पाडला. यावेळी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष व माजी आमदार वजाहत मिर्झा, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, संघटन व प्रशासन ॲड. गणेश पाटील, भिवंडी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आ. रशीद ताहीर मोमीन, प्रभारी राजेश शर्मा, प्रदेश सरचिटणीस नूर अन्सारी, जावेद फारुखी, रमाकांत भोई यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भिवंडी महानगरपालिकेतील काँग्रेसच्या यशाबद्दल नवनिर्वाचित नगरसेवकांचे अभिनंदन करून, आगामी काळात लोकहिताच्या प्रश्नांसाठी ताकदीने काम करण्याचे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी यावेळी केले.

