पुणे-सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कोणत्याही कार्यक्रमासाठी जात असताना तेथील आयोजक सर्वकाही ठिकठाक आहे की नाही याची दहावेळी तपासणी करतात. पण अनेकदा काही ना काही तरी राहून जाते आणि मग अजित पवार संबंधितांची चांगलीच कानउघाडणी करतात. असाच प्रकार आज पुण्यातील एका बैठकीपूर्वी घडला.
अजित पवार सध्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांची रणनीती आखण्यात व्यस्त आहेत. ते नियोजित भेटींसाठी आज सकाळीच पुण्यातील बारामती हॉस्टेलवर धडकले. ते येणार म्हणून कार्यकर्त्यांचा मोठा फौजफाटा व भेटीसाठी आलेले नागरीक तिथे गोळा झाले होते. पण एवढी गर्दी असूनही हॉस्टेलच्या कार्यालयाचे कुलूप उघडण्यात आले नव्हते. कार्यालयाचे दार बंदच होते. तेवढ्यात अजित पवारांचा ताफा हॉस्टेलवर पोहोचला. तेव्हाही दरवाजा उघडण्यात आला नाही. यामुळे अजित पवारांवरही काही वेळ ताटकळत उभे राहण्याची वेळ आली.
राज्याचा उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री बारामती हॉस्टेलच्या बाहेर उभे असूनही दरवाजा उघडत नव्हता. अखेर हा प्रकार पाहून अजित पवारांचा पारा चढला. त्यांनी तिथे उपस्थित कर्मचारी व कार्यकर्त्यांची चांगलीच कानउघाडणी केली. त्यानंतर त्यांनी आपल्या पीएलाही बोलावून या प्रकाराची विचारणा केली. कार्यालय उघडून कार्यकर्त्यांना आत बसू का दिले नाही? कार्यालय कशाला बंद ठेवले? चावी आणायला त्रास होत आहे का? अशा कडक शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. त्यांचा हा रौद्रावतार पाहून उपस्थित कार्यकर्ते व कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली.
अखेर घाईघाईने कार्यालय उघडण्यात आले. त्यानंतर अजित पवार आत गेले व पुढील कार्यक्रम सुरू झाला. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात अजित पवार बारामती हॉस्टेलच्या बाहेर पांढऱ्या पेहरावात उभे असल्याचे व कर्मचारी दार उघडताना कावरेबावरे झाल्याचे दिसून येत आहे.

