पुणे-सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे महापालिकेत इतर समित्यांप्रमाणे “सांस्कृतिक समिती” देखील स्थापन करावी अशी मागणी राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी केली आहे.
बाबासाहेब पाटील यांनी यासंदर्भात म्हटले आहेकी,’पुणे महानगरपालिकेची निवडणूक पार पडून नवीन सत्तास्थापना होत असताना, शहराच्या प्रशासनात शिक्षण मंडळ, वृक्ष प्राधिकरण समिती, PMPML समिती, जिल्हा नियोजन इत्यादी विविध महत्त्वाच्या समित्या कार्यरत असतात. मात्र, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या पुणे शहरात आजपर्यंत स्वतंत्र “सांस्कृतिक समिती” अस्तित्वात नाही, ही अत्यंत खेदजनक बाब आहे.
पुणे शहर हे केवळ शैक्षणिक किंवा औद्योगिक नव्हे, तर ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि कलात्मक वारशाचे केंद्र आहे. पुण्याने महाराष्ट्राला आणि देशाला अनेक दिग्गज कलाकार दिले आहेत. नाट्य, चित्रपट, संगीत आणि साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर कलाकार पुण्यात घडले, वाढले आणि आजही येथे वास्तव्य करीत आहेत. या शहरातील नाट्यगृहे, सांस्कृतिक केंद्रे, संगीत-नृत्य परंपरा, उत्सव-समारंभ आणि कलाकारांचे प्रश्न यांचा योग्य विचार आणि संवर्धन करण्यासाठी महानगरपालिकेत स्वतंत्र सांस्कृतिक समिती असणे अत्यावश्यक आहे.
आजच्या घडीला मुंबईप्रमाणेच पुणे शहरातही मोठ्या प्रमाणावर चित्रपट, वेब सिरीज, मालिका आणि जाहिरातींचे शूटिंग होत आहे. या शूटिंगसाठी आवश्यक असलेल्या परवानग्या, नियोजन, कलाकार आणि तंत्रज्ञांना सुविधा मिळाव्यात यासाठीदेखील महानगरपालिकेत सांस्कृतिक समिती असणे काळाची गरज आहे. यामुळे पुण्याच्या सांस्कृतिक आणि चित्रपट क्षेत्राला अधिक चालना मिळेल.
त्यामुळे, नवीन सत्ताधाऱ्यांनी तात्काळ पुढाकार घेऊन पुणे महानगरपालिकेत इतर जशा विविध समित्या आहेत, त्याचप्रमाणे स्वतंत्र “सांस्कृतिक समिती” स्थापन करावी, अशी मागणी आम्ही राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या वतीने पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा पवार, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त, तसेच केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे करीत आहोत.
ही समिती शहराच्या सांस्कृतिक वारशाचे संवर्धन, सांस्कृतिक उपक्रमांना चालना, कलाकारांच्या प्रश्नांना न्याय आणि पुण्यात वाढत्या शूटिंग व्यवस्थापनासाठी महत्त्वाची ठरेल, असा आमचा ठाम विश्वास आहे.
पुणे महापालिकेत इतर समित्यांप्रमाणे “सांस्कृतिक समिती” देखील स्थापन करावी – बाबासाहेब पाटील
Date:

