वाडिया, डीवायपीएटीयू, कीस्टोन स्कूल, एमआयटी एसओसीचे दमदार विजय
लोणी काळभोर : एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणे यांच्या वतीने आयोजित आठव्या विश्वनाथ स्पोर्ट्स मीट (व्हीएसएम–२०२६) अंतर्गत क्रिकेट स्पर्धेत रविवारी थरारक, एकतर्फी तसेच अत्यंत नाट्यमय सामने पाहायला मिळाले. रविवारी खेळल्या गेलेल्या चार सामन्यांत एमईएस वाडिया, डीवाय शेतकी व तांत्रिक विद्यापीठ (पीएटीयू), कीस्टोन स्कूल ऑफ इंजिनिअरिंग आणि एमआयटी स्कुल ऑफ कम्पुटींग (एसओसी) संघांनी प्रभावी विजय नोंदवत स्पर्धेची रंगत वाढवली.
एमआयटी एडीटी विद्यापीठ मैदानावर झालेल्या सामन्यात एमईएस वाडिया, पुणे संघाने कमी धावसंख्येचा यशस्वी बचाव करत मुंबईच्या पाटकर वर्धे कॉलेजला २१ धावांनी पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना एमईएस वाडियाने १८ षटकांत ७ बाद ११९ धावा केल्या. हर्षवर्धन पाटील (२९), प्रथमेश कुवर (२७) आणि कर्णधार अभि जाधव (नाबाद २४) यांनी संघाची धावसंख्या सावरली. प्रत्युत्तरात पाटकर वर्धे कॉलेजचा संघ ९८ धावांत गारद झाला. हर्षवर्धन गलांडे आणि सिद्धांत अग्वान यांनी प्रत्येकी ३ बळी घेत कमी धावसंख्येच्या बचावात निर्णायक भूमिका बजावली.
उरुळीकांचन येथील निकम स्टेडियमवर डीवायपीएटीयू संघाने एमआयटी एसबीएसआरवर १० गडी राखून दणदणीत विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना एमआयटी एसबीएसआर संघ १६ षटकांत ११०/७ अशी धावसंख्या उभारू शकला. प्रत्युत्तरात डीवायपीएटीयूच्या सलामीवीरांनी सामन्यावर पूर्ण वर्चस्व गाजवले. पार्थ गणबावले (१८ चेंडूत नाबाद ५१) आणि कर्णधार रोहित पवार (२९ चेंडूत नाबाद ५१) यांनी अवघ्या ७.३ षटकांत एकही विकेट न गमावता सामना संपवला.
एमआयटी एडीटी मैदानावर दुसऱ्या सत्रात झालेला कीस्टोन स्कूल ऑफ इंजिनिअरिंग विरुद्ध डी.वाय. आंतरराष्ट्रीय विद्यापीठ(पीआययू) आकुर्डी हा सामना स्पर्धेतील सर्वाधिक नाट्यमय ठरला. दोन्ही संघांनी १०२ धावा केल्यानंतर सामना बरोबरीत सुटला. त्यानंतर झालेल्या सुपर ओव्हरमध्ये कीस्टोन स्कूलने बाजी मारली. कर्णधार मोहन कदमने सुपर ओव्हरमध्ये केवळ ३ धावा देत सामना आपल्या संघाच्या बाजूने झुकवला आणि नंतर फलंदाजीतही निर्णायक चौकार मारत विजय निश्चित केला.
दुसऱ्या फेरीतील आणखी एका चुरशीच्या सामन्यात एमआयटी एसओसीने क्राइस्ट कॉलेजवर १५ धावांनी रोमांचक विजय मिळवला. एमआयटी एसओसीने प्रथम फलंदाजी करताना १६ षटकांत १३५ धावा केल्या. सुजल पडवळने ४७ धावांची आक्रमक खेळी केली. प्रत्युत्तरात क्राइस्ट कॉलेजने १०२ धावांची भक्कम सलामी भागीदारी करत विजयाच्या आशा पल्लवित केल्या, मात्र सिद्धांत सोलटच्या अचूक डेथ बॉलिंगमुळे सामना एमआयटी एसओसीच्या बाजूने वळला.
संक्षिप्त धावफलक :
एमईएस वाडिया, पुणे – १८ षटकांत ७ बाद ११९ (हर्षवर्धन पाटील २५ चेंडूत २९, प्रथमेश कुवर २२ चेंडूत २७, अभि जाधव* २४ चेंडूत २४; पवनप्रसाद चौलकर २/१९, अवन प्रसाद २/३०) वि.वि. पाटकर वर्धे कॉलेज, मुंबई – १५.५ षटकांत सर्वबाद ९८ (शिवम घोष २४ चेंडूत २८, प्रथम पवार १९ चेंडूत १८; हर्षवर्धन गलांडे ३/१५, सिद्धांत अग्वान ३/२५, अभि जाधव २/१६) निकाल : एमईएस वाडिया, पुणे २१ धावांनी विजयी.
एमआयटी एसबीएसआर – १६ षटकांत ७ बाद ११० (अमित बालाजी भोयटे २३ चेंडूत २७, सिद्धांत पाटील १७; मयूर यादव १/१०, ओम अनुसे १/१) पराभूत वि. डीवायपीएटीयू – ७.३ षटकांत बिनबाद ११५ (पार्थ गणबावले* १८ चेंडूत ५१, रोहित पवार* २९ चेंडूत ५१) निकाल : डीवायपीएटीयू १० गडी राखून विजयी.
कीस्टोन स्कूल ऑफ इंजिनिअरिंग – १५.५ षटकांत सर्वबाद १०२ (निलेश ३६ चेंडूत ३६, दत्तप्रसाद तानावडे २१, मोहन कदम २१; अंकुर शर्मा ४/५) वि.वि. डीवायपीआययू – १७.३ षटकांत सर्वबाद १०२ (यश उंबरे ३० चेंडूत ३१, सुजल रायके १२ चेंडूत १८; रोहन कदम ३/५, मोहन कदम २/१३) सुपर ओव्हर : डीवायपीआययू – ३/२ पराभूत वि. कीस्टोन – ५/१ निकाल : सुपर ओव्हरमध्ये कीस्टोन स्कूल ऑफ इंजिनिअरिंग विजयी.
एमआयटी एसओसी – १६ षटकांत ९ बाद १३५ (सुजल पडवळ २७ चेंडूत ४७, रोहित शर्मा ३४ चेंडूत २९; ओवेस अन्सारी २/२०, यश जाधव २ बळी, दिनेश एच २ बळी) पराभूत वि. क्राइस्ट कॉलेज – १६ षटकांत ४ बाद १२० (शेल्डन जोसेफ ४६ चेंडूत ५६, विपुल ओसवाल ३८ चेंडूत ३७; सिद्धांत सोलट २/२४) निकाल : एमआयटी एसओसी १५ धावांनी विजयी.

