पुणे- देवाच्या मनात असेल, मुंबईत आपला महापौर होईल, असे विधान उद्धव ठाकरे यांनी केले होते. यावरून मुख्यमंत्री फडणवीस यांना उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. वरच्या देवाने ठरवले की, महायुतीचा महापौर करायचा आहे. त्यामुळे आमचाच महापौर होईल, असे ते म्हणाले. तसेच महापौर कुणाला करायचे शिंदे आणि आम्ही मिळून ठरवू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
देशातील सर्वात श्रीमंत आणि राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या बृहन्मुंबई महानगरपालिकेवर अखेर 25 वर्षांनंतर ठाकरे कुटुंबाची एकहाती सत्ता संपुष्टात आली आहे. या बहुचर्चित निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीने एकूण 118 जागांसह बहुमताचा 114 चा आकडा पार करत मुंबई महापालिकेवर वर्चस्व मिळवले आहे. त्यामुळे आता मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे. मुंबईचा महापौर कुणाला करायचे याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपरोक्त विधान केले. ते आज पुण्यात माध्यमांशी संवाद साधत होते.
देवाच्या मनात असेल, मुंबई आपला महापौर होईल, असे विधान उद्धव ठाकरे यांनी केले होते. याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले, देवाच्या म्हणजे माझ्या की, वरच्या देवाच्या? असा मिश्किल प्रश्न केला. ते पुढे म्हणाले, वरच्या देवाने ठरवले की, महायुतीचा महापौर करायचा आहे. त्यामुळे आमचाच महापौर होईल.
मुंबईचा महापौर कोण होणार? कधी होणार? किती वर्षे वाटून घ्यायचे? या सगळ्या गोष्टी शिंदे आणि मी, आणि आमचे दोन्हीकडील नेते मंडळी सगळे बसवून ठरवू. त्यात काही वाद येणार नाही. आम्ही दोन्ही पक्ष छान पद्धतीने मुंबई चालवून दाखवू, असेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
मुंबईत भाजप युतीला ११९ जागा मिळालेल्या आहेत. जवळपास आमच्या १४ जागा अतिशय कमी मतांनी हारलो आहोत. एवढ्या जागा एकत्रित शिवसेनेला देखील कधी मिळाल्या नव्हत्या. त्यांच्या तीनही निवडणुकीचा रेकॉर्ड आम्ही तोडलेला आहे. पूर्ण बहुमतामध्ये आम्ही निवडून आलो आहोत. त्यामुळे कोण काय म्हणतं? गिरा तो क्या हुआ, टांग तो उपर थी, असे म्हणणारे खूप लोक असतात. त्यावर फार काही बोलायचे नसते, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांना लगावला.
शिवसेना शिंदे गटाच्या निवडणुकीतील कामगिरीवरही देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले. आमच्यासारखेच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या काही जागा कमी मतांनी गेल्या आहेत. मुंबईत पहिल्यांदाज तेही अशा पद्धतीने निवडणूक लढत होते. त्यामानाने त्यांना चांगले यश आले. अपेक्षा यापेक्षा जास्त होती, पण काही जागा या थोड्या मतांनी गेलेल्या दिसतायत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
ठाकरे बंधुंच्या युतीमध्ये बिगेस्ट लूझर मनसे राहील, असे मला राजकीयदृष्ट्या दिसत होते. माझे भाकीत या निवडणुकीने स्पष्ट केले आहे. मनसेला किंवा राज ठाकरेंना या युतीचा कुठलाही फायदा झालेला नाही. उद्धवजींना झालेला दिसतोय, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंना लगावला.
उपमुख्यमंत्री अजित पवार आज मंत्रिमंडळाच्या बैठकीला गैरहजर होते. यावरही देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. मतदानाच्या दिवशी रात्री अजित पवार माझ्याकडे येऊन गेले होते. त्यादिवशीच त्यांनी सांगितले होते की, माझ्याकडे राज्यपाल महोदय येणार आहेत. त्यामुळे मी मंत्रिमंडळाला बैठकीला येऊ शकणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

